राष्ट्रवादीतही निष्ठावतांना डावलून आयरामांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 02:01 PM2019-10-03T14:01:27+5:302019-10-03T14:02:44+5:30
मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठ्याप्रमाणावर आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी देऊन निष्ठावंताना डावलले असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र ...
मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठ्याप्रमाणावर आयात केलेल्या नेत्यांना उमेदवारी देऊन निष्ठावंताना डावलले असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र आता भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीने सुद्धा निष्ठावंताना डच्चू देत आयरामांना संधी दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. सिन्नरचे माजी आमदार कोकाटे, साताऱ्यातील भाजपचे नेते दीपक पवार यांच्यासह अनेक नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना राष्ट्रवादीने उमदेवारी जाहीर केली आहे.
विधानसभा निवडणुकीत आयाराम-गयाराम हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. भाजपने मोठ्याप्रमाणावर इतर पक्षातील नेत्यांना प्रवेश देत त्यांना उमेदवारी सुद्धा दिली आहे. त्यामुळे भाजपकडून निष्ठावंताना डावलून अनेक आयरामांना संधी देण्यात आल्याचा आरोप होत आहे. तर पक्षातील अनेक इच्छुकांनी थेट याला विरोध सुद्धा केला असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले.
मात्र आता भाजपप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा निष्ठावंताना डावलेले जात असल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या दोन्ही उमेदवारी याद्यात आयरामांना संधी देण्यात आली असल्याचे पहायला मिळत आहे. नाशिकचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बुधवारी मुंबईत प्रवेश केला व लगेच त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
त्याचप्रमाणे साताऱ्याचे भाजप नेते आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. त्यांना सुद्धा साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूरचे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी सुद्धा दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना सुद्धा राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत सुद्धा भाजपप्रमाणे बंडखोरी झाली तर नवल वाटू नयेत.