शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 07:21 PM2024-11-11T19:21:54+5:302024-11-11T19:26:32+5:30

शरद पवार यांनी केलेल्या टीकेला राज ठाकरे यांनी पुण्यातील एक उदाहरण देऊन प्रत्युत्तर दिलं आहे.

Maharashtra Assembly Elections 2024 Raj Thackeray replied to Sharad Pawar on the debate over casteism | शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."

शरद पवार म्हणाले जातीवाद केल्याचे उदाहरण द्या; राज ठाकरेंनी भुजबळांच नाव घेत म्हटलं, "पुणेरी पगडी..."

Raj Thackeray on Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आपल्या सभांमधून महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष करत आहेत. राज ठाकरे यांनी सभांमध्ये उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवार यांनीच महाराष्ट्रात जातीचं विष कालवलं अशी टीका राज ठाकरेंनी केली होती. राज ठाकरेंच्या आरोपांवर शरद पवार यांनी भाष्य केलं होतं. आता एका मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे यांनी एका सभेत बोलताना शरद पवार हे महाराष्ट्रातील जातीयवादाचे जनक असल्याचे म्हटलं होतं. त्यानंतर या टीकेला प्रत्युत्तर देताना मी जातीयवाद केल्याचे एक पुरावा त्यांनी द्यावां, असं आव्हान शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिलं होतं. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या एका कार्यक्रमाचे उदाहरण देत प्रत्युत्तर दिलं आहे.

“शरद पवार हे जातीयवाद करतात, त्याचं एक सोपं उदाहरण देतो. त्याचा व्हिडीओसुद्धा माध्यमांकडे आहे. पुण्यात एका कार्यक्रमात छगन भुजबळ यांना लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली होती. शरद पवारांनी ती काढून त्यांनी ज्योतीबा फुले यांची पगडी घातली. खरं तर ती पगडी घालण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण पुणेरी पगडी घालू नका ज्योतीबा फुलेंची पगडी घालत जा. सत्काराच्या वेळी जी गोष्ट घडली ती घडली. ते एक उदाहरण दाखवा म्हणाले, हेच ते उदाहरण आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

तसेच आयुष्यात काहीही केलं नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. त्यावरही राज ठाकरेंनी यावेळी प्रत्युत्तर दिलं. "शरद पवार यांना वयानुसार काही गोष्टी आठवत नसतील.पण मी केलेल्या अनेक गोष्टीचं पुस्तक त्यांना पाठवतो. त्यानंतर त्यांना समजेल की ते कोणत्या गोष्टी विसरले आहेत”, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

काय म्हणाले होते शरद पवार?

"मी राज्यात जातीयवादी राजकारण केल्याचं एक उदाहरण तरी मला कोणी दाखवावं. ज्यांनी उभ्या आयुष्यात काही केलंच नाही, वक्तव्य केली, टीका टिप्पणी केली त्यांच्या विधानावर काय भाष्य करायचं? दुर्लक्ष करायचं. महाराष्ट्रातली जनता शहाणी आहे. त्यांनी त्यांना ( राज ठाकरे) एकच जागा दिली संपूर्ण महाराष्ट्रात," असं शरद पवारांनी म्हटलं होतं.
 

Web Title: Maharashtra Assembly Elections 2024 Raj Thackeray replied to Sharad Pawar on the debate over casteism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.