मोठी बातमी: ठाकरे-फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, विचारपूसही केली; चर्चा तर होणारच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:52 PM2024-06-27T12:52:54+5:302024-06-27T14:54:21+5:30

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 :२०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर जहरी टीका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 :Uddhav Thackeray and Devendra Fadnavis meet in Vidhan Bhavan, sparks discussions | मोठी बातमी: ठाकरे-फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, विचारपूसही केली; चर्चा तर होणारच!

मोठी बातमी: ठाकरे-फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, विचारपूसही केली; चर्चा तर होणारच!

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यातील बदलेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आजपासून सुरू झालेलं राज्य विधानसभेचं अधिवेशन हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरणार आहे. या अधिवेशनात लोकसबा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेली सत्ताधारी महायुती आणि विजयामुळे आत्मविश्वास वाढलेली महाविकास आघाडी यांच्यात विविध मुद्द्यांवरून जोरदार खडाजंगी होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होत असतानाच घडलेल्या एका घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर मुख्यमंत्रिपदावरून विवाद होऊन युती तुटल्यापासून एकमेकांवर जहरी टीका करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज विधान भवनाच्या आवारात भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक संवादही झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज विधानभवनाच्या आवारात भेट झाली. तसेच अनौपचारिक संवादानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच लिफ्टने प्रवास केला. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जवळीकीची ही नांदी तर नाही ना, अशी विचारणा राजकीय वर्तुळातून होत आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत ताठर भूमिका घेतली होती. तसेच भाजपासोबतची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केले होते. मात्र पुढे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपानं हे सरकार पाडले होते. या सर्व घडामोडींमुळे उद्धव ठाकरे आणि भाजपा नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपाचं बहुमत हुकल्याने अनेक समिकरणं बदलली आहेत. तसेच या निकालाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर पडण्याची शक्यता असल्याने भाजपा उद्धव ठाकरेंशी असलेली जुनी कटुता विसरून नव्याने मैत्री करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दावे केले जात आहेत. तसेच आज झालेल्या ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील भेटीमुळे या चर्चांना आणखीनच उधाण आलेलं आहे.  

Web Title: Maharashtra Assembly Monsoon Session 2024 :Uddhav Thackeray and Devendra Fadnavis meet in Vidhan Bhavan, sparks discussions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.