Maharashtra Assembly Session 2021 : ... तर लोकशाहीची हत्या होईल, देवेंद्र फडणवीस कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 01:54 PM2021-12-27T13:54:46+5:302021-12-27T13:54:53+5:30

नितेश राणेंवरुन विधानसभेत गदारोळ. सत्ताधारी विरोधकांमध्ये शाब्दीक खडाजंगी.

Maharashtra Assembly Session 2021 devendra fadnavis speaks on nitesh rane | Maharashtra Assembly Session 2021 : ... तर लोकशाहीची हत्या होईल, देवेंद्र फडणवीस कडाडले

Maharashtra Assembly Session 2021 : ... तर लोकशाहीची हत्या होईल, देवेंद्र फडणवीस कडाडले

googlenewsNext

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवातही विरोधकांनी पायऱ्यावर बसून केली होती. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे दुसऱ्या दिवशी सभागृहात जात असताना आमदार नितेश राणे हे विधानसभेच्या पायऱ्यावर इतर भाजप सदस्यांसमेवत बसले होते. त्यावेळी, नेमकं आदित्य ठाकरे पायरी चढून वर जात असताना, नितेश राणेंनी त्यांच्याकडे पाहून म्याव, म्याव... असा आवाज काढला. नितेश राणेंच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियातून समोर आला. या प्रकरणाचे पडसादही विधीमंडळात उमटल्याचं दिसून आलं. 

सोमवारी सभागृहाच्या कामाकाजादरम्यान नितेश राणेंचा हा मुद्दा गाजला. तसंच सत्ताधारी आणि विरोधक या मुद्द्यावरुन आमनेसामने आले. यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी नितेश राणे यांच्या निलंबनाचीही मागणी केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं. "सभागृहात अध्यक्षांनी विरोधीपक्षाकडे पाहायचंच नाही असा नवा पायंडा झाला आहे का?," असा सवाल फडणवीस यांनी केला.

"आम्ही लोकशाहीत लढणारे लोक आहोत, रडणारे नाही. नितेश राणे यांच्यासंदर्भात जो विषय उपस्थित झाला यासंदर्भात आम्ही यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली होती. कोणत्याही पक्षाच्या सदस्यानं असं वागू नये हे आम्ही सांगितलं होतं. याच सभागृहात जेव्हा भास्कर जाधव या ठिकाणी असायचे आणि भुजबळ समोर यायचे तेव्हा भुजबळांना हुप हुप करणारे भास्कर जाधवही होते, हे सभागृहानं पाहिलंय. त्याचंही समर्थन नाही," असं त्यांनी नमूद केलं. 

"या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सभागृहाबाहेर जे घडलं त्याचं आम्ही समर्थन करणार नाही. परंतु जर त्या गोष्टीचा फायदा घेऊन एखाद्या सदस्याला निलंबित करायचं हे ठरवून आले असतील तर हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. कायदा, संविधानाचं या ठिकाणी पालन होत नाही. ज्या वेळी भास्कर जाधवांनी घटना सांगितली तेव्हा मी जाहीर भूमिका घेतली. आमचा सदस्य असला तरी भूमिका घेण्याची आमच्यात हिंमत आहे. ज्याप्रकारे १२ सदस्य निलंबित केले तसा आमचा एक सदस्य निलंबित करायचाय हा डाव दिसून येतोय. लोकसभेत एका सेशनपुरतं निलंबन झालंय. आम्ही लढणारे लोकं आहोत. जे ठरवून चाललंय ते योग्य नाही. आवश्यकता असेल तर आम्ही आमच्या सदस्यालाही जाब विचारू," असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

... तर लोकशाहीची हत्या होईल
"आमच्यावर कितीही निलंबनाची कारवाई केली तरी आम्ही लढू. परंतु या ठिकाणी जे ठरवून चाललंय हे योग्य नाही. बाहेरच्या घटनांवर अशाप्रकारे काही सुरू झालं, सरकार बदलंत असतात, एकदा जर पायंडा पडला तर येणारं सरकार कोणत्याही विरोधकांना ठेवणार नाही आणि लोकशाहीची हत्या होईल," असंही ते म्हणाले.

Web Title: Maharashtra Assembly Session 2021 devendra fadnavis speaks on nitesh rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.