"अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी?’’, विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:13 PM2024-07-09T15:13:02+5:302024-07-09T15:14:01+5:30
Maharashtra Assembly Session 2024: अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar ) यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत केली आहे.
मुंबई - राज्यात अँम्बुलन्स घोटाळा झाला आहे. या खरेदीत टेंडर फुगवले गेले असून तीन हजार कोटींचे काम दहा हजार कोटींवर नेले आहे. ३०टक्क्यांच्यावर कमिशन या घोटाळ्यात घेतले गेले आहे. हा अँम्बुलन्स घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आज विधानसभेत केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लुटा आणि गुजरातला वाटा, अशा शब्दात त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, अँम्बुलन्स घोटाळा हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हे सरकार रूग्णांच्या टाळूवरचे लोणी खात आहे. सनदी अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याला विरोध केला म्हणून त्यांची बदली देखील झाली. निवडणूक फंडासाठी हा उद्योग सुरू आहे. आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघत असताना हा घोटाळा केला जात आहे. महाराष्ट्र लूटून साफ करण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.