"भ्रष्टाचारी झाले चौकीदार, असा महायुतीचा कारभार’’, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मविआचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 12:41 PM2024-07-09T12:41:25+5:302024-07-09T12:43:09+5:30
Maharashtra Assembly Session 2024: राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विधिमंडळाच्या परिसरात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले.
मुंबई - राज्यात वाढलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विधिमंडळाच्या परिसरात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘’भ्रष्टाचारी झाले चौकीदार, असा महायुतीचा कारभार’’, ‘’भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चीट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’’, अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
मुंबई येथे महाविकास आघाडीच्या आमदारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. भाजपा हटवा, भ्रष्टाचार मिटवा, महायुती सरकारची ऑफर ‘’पक्षप्रवेश करा, क्लीन चिट मिळवा’’, ‘’शूर आम्ही मिंधे, दादा आणि भाजपचे सरदार, चिरडून गरिबांना होऊ पसार’’, मदतीला आमच्या 'मिंध्यांचे सरकार'', ‘’सर्वसामान्यांच्या जीवाला नाही मोल, श्रीमंतांचा पैशांच्या जीवावर सुरू खेळ’’, ‘’भाजपाची वॉशिंग मशीन, आधी आरोप मग क्लीन चीट’’, ‘’भ्रष्टाचारी झाले चौकीदार, असा महायुतीचा कारभार’’, अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत राज्यातील भ्रष्टाचाराविरोधात महाविकास आघाडी आक्रमक होत गगनभेदी घोषणा देत महायुती सरकारला घेरले.
भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चीट देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, भाजपाच्या वॉशिंग मशिनचा धिक्कार असो,भाष्ट्राचारी सरकार हाय हाय,टक्केवारी सरकार हाय हाय,खोके सरकार हाय हाय, हिट अँड रनच्या आरोपींना मदत करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो घोषणा देत विधानभवन परिसर दणाणून सोडला.