"भावनांचा आदर करा, नागपूर दीक्षा भूमी येथील भूमिगत पार्किगचे काम तात्काळ थांबवा", विजय वडेट्टीवार यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 02:52 PM2024-07-01T14:52:01+5:302024-07-01T14:53:34+5:30
Maharashtra assembly session 2024 Update: नागपूर येथील दीक्षा भूमी येथे भूमीगत पार्कींच्या कामाला जनतेचा विरोध आहे. या कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी करीत आंबेडकरी संघटना आंदोलन करीत आहेत
मुंबई - नागपूर येथील दीक्षा भूमी येथे भूमीगत पार्कींच्या कामाला जनतेचा विरोध आहे. या कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो. त्यामुळे हे काम थांबविण्याची मागणी करीत आंबेडकरी संघटना आंदोलन करीत आहेत. परंतु आंबेडकरी अनुयांचा विरोध डावलून सरकार दडपशाहीचा अवलंब करून या कामाला स्थगिती देत नाही. त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या असून आता दीक्षा भूमीवर मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे लोक भावनेचा आदर करून हे काम तात्काळ थांबवावे, अशी आमची भूमीका आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून गृहमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आंदोलकांशी चर्चा करावी, अशी भूमीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. दरम्यान, दीक्षा भूमी येथील भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला स्थगिती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली आहे.
लोकांचा विरोध असताना, दीक्षा भूमी येथील स्तूप आणि मूळ ढाचाला धोका होण्याची भीती असताना भूमीगत पार्कींगचा अट्टाहास कशासाठी, या कामातून कोणाचा फायदा होणार आहे असे सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने जर वेळीच या प्रकरणाची दखल घेतली असती तर आंदोलन तीव्र झाले नसते. परंतु सरकार संवेदनशील नाही जनतेच्या भावनांचा आदर करत नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ येते,अशा शब्दात श्री. वेडेट्टीवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, या सरकारच्या काळात जेवढी आंदोलने झाली ती सर्व आंदोलने संवेदनशीलपणे हाताळली नाहीत. त्यामुळे आंदोलने चिघळली गेली. शेतकरी, विद्यार्थी, महिला, कर्मचारी तसेच आरक्षणावरून सुरू असलेली आंदोलने भाजपच्या काळात दडपण्याचाच प्रयत्न केला गेला. त्यामुळे आज देखील दिक्षा भूमी येथे तशीच परीस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांची चर्चा करून यावर तोडगा काढावा.