पावसाळी अधिवेशनाची तारीख बदलली; आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 19:29 IST2022-08-08T19:28:28+5:302022-08-08T19:29:32+5:30
Maharashtra Assembly Session : पावसाळी अधिवेशन आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.

पावसाळी अधिवेशनाची तारीख बदलली; आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार!
मुंबई : राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Session) १७ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, आधी अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती समोर आली होती. यासंदर्भात राज्याच्या विधीमंडळ सचिवालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र, आता या अधिवेशनाची तारीख बदलली आहे.
विशेष म्हणजे, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारानंतर मंत्र्यांना आपले कामकाज समजून घेण्यासाठी जवळपास चार दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे या अधिवेशनाची तारीख बदलल्याचे म्हटले जाते. यानुसार राज्याच्या विधीमंडळाचे आगामी अधिवेशन १७ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत असल्याची शक्यता वर्तविली जाते. दरम्यान, अधिवेशनच्या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात येतील आणि या कालावधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयात उपस्थिती अनिवार्य असणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात नवे सरकार स्थापण होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने विरोधक टीका करीत आहेत. तसेच, अधिवेशन कधी होणार याबाबत ही विचारणा केली जात होती. परंतु पावसाळी अधिवेशन आता १७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता
मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने आत्तापर्यंत विरोधकांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. मागच्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत कायम दिसत असल्याने त्याची देखील चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होती. आता उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळात विस्तारात नेमकं मंत्रिपद कोणाला मिळणार? याकडे देखील लक्ष लागले आहे. याशिवाय, यानंतर होणारे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता देखील अधिक आहे.
उद्या शपथविधी होणार
उद्या सकाळी ११ वाजता राजभवन येथे शपथविधी होणार आहे. शिंदे गटातील ६ ते ७ आमदार उद्या शपथ घेतील, अशी शक्यता आहे. तर भाजपाचे ११ जण उद्या मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता राज्याच्या मंत्रिमंडळात असावा, अशी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे.