विधानसभेचे विशेष अधिवेशन पुढे ढकललं, आता होणार 'या' तारखेला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 11:45 AM2022-07-01T11:45:39+5:302022-07-01T11:47:19+5:30
Maharashtra Assembly Session : विधानसभेचे विशेष अधिवेशन 2 व 3 जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र, आता विधानसभेच्या या अधिवेशनाची तारीख बदलली आहे.
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते. विधानसभेचे विशेष अधिवेशन 2 व 3 जुलै रोजी घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र, आता विधानसभेच्या या अधिवेशनाची तारीख बदलली आहे.
विधानसभेचे विशेष अधिवेशन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 2 आणि 3 जुलैला होणारे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे अधिवेशन आता 3 आणि 4 जुलै रोजी होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव नियुक्त सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी हे अधिवेशन बोलावले आहे. दरम्यान, अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटलांच्या नावाची चर्चा
आता विधानसभेचे अधिवेशन 3 आणि 4 जुलैला बोलावण्यात आले आहे. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचेही नाव चर्चेत आहे. आता यापैकी कुणाची निवड विधानसभा अध्यक्षपदी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.