विधानसभा अक्ष्यक्षपद निवडणूक: शिवसेनेच्या दोन गटात 'व्हिप-वॉर'; शिंदे गटाकडूनही व्हिप जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 09:37 AM2022-07-03T09:37:11+5:302022-07-03T09:37:43+5:30
शिंदे गटाच्या व्हिपमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला स्वत: विरोधातच करावं लागणार मतदान
Maharashtra Assembly Speaker Election: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या १०-१२ दिवसांपासून अनेक विचित्र आणि विचार करण्यापलिकडच्या गोष्टी घडत आहेत. त्यातील काही गोष्टी या अभूतपूर्व अशा स्वरूपाच्या आहेत. आज राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून त्यासाठी सर्वच पक्षांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी करण्यात आला आहे. तशातच आता शिवसेनेच्या बंडखोर गटाने हा आदेश धुडकावून लावत शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवरून भरत गोगावले यांच्या स्वाक्षरीचा दुसरा व्हिप जारी केला आहे. या व्हिपमध्ये ठाकरे गटातील १६ आमदारांसह सर्व आमदारांनी भाजपाच्या राहुल नार्वेकर या उमेदवारालाच मतदान करण्याचा पक्षादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या विधानसभेत शिवसेनेच्या दोन गटांमध्ये 'व्हिप-वॉर' सुरू असून नक्की कोणाचा व्हिप लागणार हा पेच अधिकच वाढल्याचे दिसत आहे.
आजपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असून पहिल्याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी सरकारच्या वतीने ऍड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. या निवडणुकीत नार्वेकर यांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने (शिंदे गट) आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला आहे. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदारांना देखील लागू असेल. व्हीपची प्रत या आमदार महोदयांना देखील पाठवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नक्की कोणाचा व्हिप लागणार, व्हिप न मानणाऱ्या आमदारांवर कारवाई होणार का या सर्व गोष्टींबाबत महाराष्ट्राच्या विधानसभा अधिवेशनातच उलगडा होईल.