Maharashtra Assembly Speaker Election: राज्यपालांनी विधानसभा अध्यक्ष निवड कार्यक्रमावर सही करणे टाळले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 07:19 PM2021-12-26T19:19:06+5:302021-12-26T19:19:42+5:30
Maharashtra Assembly Speaker Election: काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतू आम्ही लोकसभेला फॉलो करत असल्याने राज्यपालांनी या निवडणुकीस मंजुरी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.
सध्या सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून जोरदार हाललाची सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना आवाजी पद्धतीने निवडणूक घ्यायची आहे, तर भाजपाला मतदानाने. यामुळे 28 तारखेला होणाऱ्या अध्यक्ष निवडीवर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीसाठी गेले होते.
काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. परंतू आम्ही लोकसभेला फॉलो करत असल्याने राज्यपालांनी या निवडणुकीस मंजुरी द्यावी अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे. राजभवनावर नुकतीच शिष्टमंडळाने भेट घेतली. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची कार्यक्रम पत्रिका राज्यपाल यांच्या सहीसाठी पाठवण्यात आली असून सही करण्याची विनंती केली आहे. मात्र, राज्यपालांनी यावर आपल्याला अभ्यास करण्यासाठी वेळ हवा असल्याचे म्हटले आहे.
राज्यपालांच्या भेटीनंतर काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना याची माहिती दिली. शिष्टमंडळामध्ये थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ होते. 'राज्यपाल यांना विनंती करण्यासाठी आलो होतो. त्यांनी निवडणूक कार्यक्रम पत्रिकेवर सही करून कार्यक्रम जाहीर करावा. पण त्यांना थोडा वेळ हवा आहे. त्यांना अभ्यास करायचा आहे. मला अपेक्षा आहे की ते उद्यापर्यंत या कार्यक्रमाला मान्यता देतील आणि निवडणूक होईल, असे थोरात म्हणाले.
राज्यपालांना निवडणूक कार्यक्रमाच्या पद्धतीवर, बदललेल्या नियमाविषयी अभ्यास करायचा आहे. काही तांत्रिक बाबींची माहिती घ्यायची आहे. 12 निलंबित आमदार किंवा विधानपरिषदेचे १२ आमदार यावर चर्चा झाली नाही. नियमात बदल केलेत त्याविषयी राज्यपालांना कायदेशीर दृष्ट्या अभ्यास करायचा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.