मित्राचा झाला शत्रू, शत्रूचा झाला मित्र; आमदारकी आपल्याच घरात हेच सूत्र

By संतोष भिसे | Published: October 28, 2024 06:25 PM2024-10-28T18:25:06+5:302024-10-28T18:26:59+5:30

राष्ट्रवादी, शिवसेनेच्या फुटीनंतर कार्यकर्ते आमनेसामने

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 A friend becomes an enemy, an enemy becomes a friend; Legislation is the formula in our own house | मित्राचा झाला शत्रू, शत्रूचा झाला मित्र; आमदारकी आपल्याच घरात हेच सूत्र

मित्राचा झाला शत्रू, शत्रूचा झाला मित्र; आमदारकी आपल्याच घरात हेच सूत्र

संतोष भिसे

सांगली : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळविण्याच्या खटपटीत मित्राचे शत्रू झालेत, तर शत्रूचे मित्र झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत विधानसभेचे तिकीट मिळवायचेच आणि आमदारकी घरात आणायचीच या हेतूने वर्षानुवर्षाच्या स्नेहबंधांवर राजकारण्यांनी पाणी सोडल्याचे दिसून येत आहे.

मिरज, विटा, इस्लामपूर, जत, आटपाडी आदी मतदारसंघांत तिकिटासाठी टोकाचा संघर्ष उद्भवला आहे. त्यातूनच कोणताही विधीनिषेध न ठेवता उमेदवारीसाठी वाट्टेल ते करण्यापर्यंत नेत्यांची मजल गेली आहे. मिरजेत गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ भाजपसाठी काम करणाऱ्या प्रा. मोहन वनखंडे यांनी अवघ्या वर्षभरात वेगळी चूल मांडली. २००९ पासून ते सुरेश खाडे यांचे सच्चे सहकारी होते; पण गेल्या वर्षभरापासून त्यांनी जनसुराज्यसोबत जवळीक केली. शेवटच्या टप्प्यात तर थेट काँग्रेसचा हात हातात घेतला; पण महाविकास आघाडीच्या जागावाटपात मिरजेची जागा उद्धवसेनेला सुटली. त्यामुळे आता त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. भाजपमधील मित्र आणि सहकारी दुरावले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विट्यामध्ये वैभव पाटील अजित पवार गटात गेले. पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली; पण निवडणुकीत उमेदवारीसाठी त्यांनी ऐनवेळेस विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे सर्वेसर्वा शरद पवार यांची सांगलीत भेट घेतली. या टोकाच्या घडामोडीनंतरही रविवारपर्यंत त्यांची उमेदवारी अनिश्चितच होती.

सांगलीत सुधीर गाडगीळ यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करताच भाजपमध्येच इच्छुकांची गर्दी झाली. पृथ्वीराज पवार, शेखर इनामदार, शिवाजी डोंगरे यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. पवार यांनी कार्यकर्त्यांच्या स्तरावर जोरदार तयारी केली, तर इनामदार यांच्या मुंबईला फेऱ्या वाढल्या; पण भाजपने ऐनवेळेस गाडगीळ यांनाच पुन्हा संधी दिल्याने इनामदार यांचा भ्रमनिरास झाला. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना यावे लागले. खुद्द गाडगीळ यांनीही उमेदवारी दाखल करण्यापूर्वी इनामदार यांच्या कार्यालयात जाऊन गळाभेट घेतली.

तासगावमध्ये कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेससोबत संघर्ष केलेल्या संजय पाटील यांनी उमेदवारीसाठी त्यांचाच मैत्रीचा हात स्वीकारला. थेट पक्षप्रवेशही केला. आटपाडीच्या राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अनेक वर्षांच्या भाजपसोबच्या घरोब्यानंतर शरद यांच्याशी जवळिकीचा प्रयत्न केला.

जत, तासगाव- कवठेमहांकाळमध्ये टोकाचा संघर्ष

गोपीचंद पडळकर आणि विलासराव जगताप हे एकाच पक्षाचे सदस्य; पण सध्याच्या निवडणुकीत त्यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू झाला आहे. पडळकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा प्रचार करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे कधीकाळचे सहकारी आता राजकीय शत्रू झाले आहेत. कवठेमहांकाळमध्ये अगदी अलीकडे म्हणजे लोकसभेला परस्परांना आव्हान-प्रतिआव्हान देणारे संजय पाटील आणि अजितराव घोरपडे यांनी विधानसभेला मात्र गळ्यात गळे घातले आहेत.

राष्ट्रवादी, शिवसेनेच्या फुटीनंतर कार्यकर्ते आमनेसामने

राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांच्या फुटीनंतर कार्यकर्तेही दुभंगले. वर्ष-दीड वर्षांपूर्वीपर्यंत पक्षादेश शिरसावंद्य मानून काम करणारे कार्यकर्ते आता निवडणुकीत मात्र परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 A friend becomes an enemy, an enemy becomes a friend; Legislation is the formula in our own house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.