मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे रिंगणात; आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईही मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:22 PM2024-10-24T12:22:33+5:302024-10-24T12:24:38+5:30
६५ उमेदवारांची यादी जाहीर; आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, दिलीप सोपल, शंकरराव गडाख, वरुण सरदेसाई, राजन विचारे आदींचा समावेश
मुंबई: महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उद्धवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी ६५ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, दिलीप सोपल, शंकरराव गडाख, वरुण सरदेसाई, राजन विचारे आदींचा समावेश आहे.
उमेदवार यादी जाहीर करणारा उद्धवसेना हा मविआतील पहिला पक्ष ठरला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध उद्धवसेनेने केदार दिघे यांना ठाण्याच्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघात उमेदवारी दिली. दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे असून उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. ठाण्यात लोकसभेला पराभूत राजन विचारे यांना ठाणे शहरमधून उमेदवारी मिळाली. तिथे भाजपकडून संजय केळकर लढत आहेत. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध डोंबिवलीतून दीपेश म्हात्रे लढतील. म्हात्रे आधी शिंदेसेनेत होते. माजी खासदार उन्मेष पाटील यांना भाजपमधून आले अन् उमेदवारीचा झाला लाभ
रत्नागिरी मतदारसंघात सुरेंद्र (बाळ) माने यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना राज्याचे उद्योगमंत्री शिंदेसेनेचे उदय सामंत यांच्याशी होईल. सावंतवाडीतून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात परवा भाजपमधून आलेले राजन तेली यांना उद्धवसेनेने उमेदवारी दिली.
रामटेकची जागा उद्धवसेनेला
रामटेकच्या जागेवरून उद्धवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. ही जागा अखेर उद्धवसेनेला मिळाली आहे. तिथे नागपुरातील बड़े व्यावसायिक विशाल बरबटे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे या जागेसाठी इच्सुक असलेले जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक काय करतात याबाबत उत्सुकता आहे.
आदित्य ठाकरे वरळीतून
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे अपेक्षेप्रमाणे वरळीतून लढतील. माजी मंत्री भास्कर जाधव गुहागरमधून तर माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र समीर देसाई हे गोरेगाव: मुंबई मतदारसंघात उमेदवार असतील. माजी मंत्री शंकरराव गडाख हे नेवासामध्ये पुन्हा भाग्य आजमावतील.
मातोश्रीच्या अंगणात वरुण सरदेसाई उमेदवार
ठाकरे परिवाराचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला हा वांद्रे पूर्व मतदारसंघात येतो. तेथे आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई हे उमेदवार असतील. काँग्रेसमधून अजित पवार गटात गेलेले निशान सिद्दीकी येथे विद्यमान आमदार आहेत. उद्धवसेनेतील नेत्यांची मुले, नातेवाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुडाळमध्ये विद्यमान आमदार वैभव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली त्यांचा सामना शिंदेसेनेचे नीलेश राणे यांच्याशी होईल.
खासदार संजय राऊत यांचे बंधू रिंगणात
उद्धवसेना खा. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत विक्रोळीतून लढतील. ते येथील विद्यमान आमदार आहेत. सुनील प्रभू हे दिंडोशीतून पुन्हा लढतील. शिवसेना, मनसे, भाजप असा प्रवास केलेले वसंत गीते नाशिकमध्यचे उमेदवार असतील.