Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 08:56 PM2024-11-21T20:56:26+5:302024-11-21T20:58:59+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत कोणता गट बाजी मारणार, मतदार कोणाला कौल देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतदान संपताच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज आले. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तीन एक्झिट पोलनी मविआला सत्तेत बसताना दाखविले आहे. एकच एक्झिट पोल असा आहे की, ज्याने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेले नाही.
अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला आहे. यामध्ये महायुतीच पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते, असा कौल देण्यात आला आहे. एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला १७८ ते २०० जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला ८२ ते १०२ जागा मिळतील. तर अन्य आणि अपक्षांना ०६ ते १२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दोन्ही राष्ट्रवादी तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा?
अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, शिवसेना शिंदे गटाला ५३ ते ५८ डागा मिळतील, असा अंदाज असून, शिवसेना ठाकरे गटाला २६ ते ३२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, शिवसेना शिंदे गटाला १३ टक्के मते मिळतील, तर ठाकरे गटाला १२ टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. दुसरीकडे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३० जागा मिळू शकतील. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २६ ते ३० जागा मिळू शकतील, असा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ११ टक्के मते मिळून वरचढ ठरू शकेल. तर अजित पवार गटाला ७ टक्के मते मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला ९८ ते १०७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महायुतीतील अन्य पक्षांना २ ते ५ जागा मिळतील, असा अंदाज आहे. महाविकास आघाडीचा विचार केल्यास काँग्रेस मोठा पक्ष ठरेल. काँग्रेसला २८ ते ३६ जागा आणि मविआतील अन्य पक्षांना २ ते ४ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.