“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:27 PM2024-11-19T16:27:23+5:302024-11-19T16:30:14+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विनोद तावडेंना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विरारमधील हॉटेल विवांतामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. विनोद तावडे पैसे वाटण्यासाठी आले होते, असा मोठा आरोप बविआने केला. तर या हॉटेलमधून १० लाखांची रोख मिळाली आहे. तसेच अनेक डायऱ्या मिळाल्या आहेत, ज्यात व्यवहाराच्या नोंदी सापडल्याचा दावा स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.
विनोद तावडे ५ कोटी घेऊन येत आहेत, हे भाजपावाल्यांनीच मला सांगितले. मला वाटले की, विनोद तावडे राजकीय नेते आहे, हे असे छोटे काम करणार नाही. मात्र आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तेव्हा ते हॉटेलमध्ये पैसे वाटत होते. हॉटेलमधील सीसीटीव्ही बंद होता. आम्ही आल्यावर सीसीटीव्ही सुरु केला. हॉटेल मालकांनी असे का केले, हे त्यांनाच विचारा. हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला पाहिजे. विनोद तावडे मला सारखे फोन करत होते. मला सोडवा, माझी चूक झाली, मला सोडवा, अशी विनंती विनोद तावडे करत होते. विनोद तावडे यांनी मला २५ फोन केले, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. या सगळ्या घडामोडीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना कारवाईची मागणी केली आहे.
भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी
राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यापासून सत्ताधारी पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि पैशाचा गैरवापर सुरु आहे. आदर्श आचारसंहिता आणि नियम डावलून मतदारांना पैशांचे वाटप सुरु आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना मतदारांना पैसे वाटताना रंगेहाथ लोकांनी पकडले आहे. भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांचा वापर करून भाजपा आणि सत्ताधारी मते विकत घेऊन लोकशाहीला काळीमा फासण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाने भाजप आणि विनोद तावडेंवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
दरम्यान, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत, त्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. पण राज्यात सत्ताधारी पक्षांकडून दररोज आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. वसई विरार परिसरातील विवांता हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी मंत्री विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटत असताना नागरिकांनी त्यांना रंगेहाथ पकडले. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ वृत्तवाहिन्यांवरून संपूर्ण देशाने पाहिले आहेत. घटनास्थळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी उपस्थित होते. जवळपास १० लाख रुपयांची रोकड जप्तही केली आहे पण कुणालाही अटक केली नाही. निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाबाहेरील नेत्यांनी व स्टारप्रचारकांनी मतदारसंघात थांबण्यास कायद्याने मनाई असतानाही तावडे वसई विरार मध्ये काय करत होते? निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी व पोलिसांनी त्यांना का रोखले नाही? पैसे वाटताना रंगेहाथ पकडूनही त्यांना अटक का केली नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नाशिक शहरात एका हॉटेलमध्ये मोठी रक्कम सापडली होती. त्यापूर्वीही पुणे परिसरात सत्ताधारी पक्षाशी संबंधित एका गाडीतून पाच कोटी रुपयांची रक्कम सापडली होती. राज्याच्या विविध भागात दररोज मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये मिळत आहेत पण दुर्देवाने काहीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी भाजप आणि विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी थोरात यांनी केली आहे.