महायुतीला धक्का! भाजपा नेत्याने भाकरी फिरवली? उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 05:33 PM2024-11-04T17:33:00+5:302024-11-04T17:33:26+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सलग दोन निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपाच्या माजी आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पुढे जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची धावपळ होताना पाहायला मिळाली. अनेक ठिकाणच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. परंतु, काही ठिकाणी बंडखोरांनी बंडाचा झेंडा कायम ठेवत निवडणूक लढण्याचा निर्धार कायम ठेवल्याचे दिसले. यातच भाजपाच्या माजी आमदारांनी महायुतीला मोठा धक्का दिला. बंडखोरी करून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी थेट शरद पवार गटाला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वपक्षीयांनी आता प्रचार करण्याकडे मोर्चा वळवला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्य लढत होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान असून, २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. यातच भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु, शरद पवार गटाला पाठिंबा दिल्याने महायुतीला धक्का मानला जात आहे.
संगीता ठोंबरे यांच्या निर्णयाने महायुतीचे टेन्शन वाढले
केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. संगीता ठोंबरे यांच्या या निर्णयामुळे महायुतीचे टेन्शन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, २०१४ मध्ये संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. परंतु २०१९ च्या निवडणुकीत संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला.