“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 19:23 IST2024-11-18T19:22:04+5:302024-11-18T19:23:50+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जनतेचा विश्वास आमच्या पाठिशी आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आता मतदानादिवशी जनतेचा कौल कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत निवडणुकांनंतर दिलेली आश्वासने काँग्रेस विसरते, असे म्हटले आहे.
लाडक्या बहिणींना सांगायचे आहे की, आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत, महाविकास आघाडीवाले तुमचे सावत्र भाऊ बाहेर फिरत आहेत. काँग्रेसवाले सावत्र भाऊ आणि तुतारीवाले सावत्र भाऊ हे कोर्टात गेले. पण कोर्टाने सांगितले की, योजना बंद होणार नाही. त्यानंतर या सावत्र भावांचे तोंड बारीक झाले. आता तुम्हाला जनसामान्यांचे नेते पाहिजेत की, घराणेशाहीचे नेते हवे आहेत? हे आता तुम्हाला ठरवायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मल्लिकार्जुन खरगे यांच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर
आपण नमो किसान योजना आणली. आता पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला तर १२ हजार नाही तर १५ हजार या योजनेच्या माध्यमातून आपण देणार आहोत. तसेच हमी भावापेक्षा जेव्हा जेव्हा कमी भाव शेतकऱ्यांना मिळेल तेव्हा दोन्ही मधला फरक आपले सरकार देईल. राज्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले होते. त्यांनी म्हटले की त्यांचे सरकार आले तर सात हजार रुपये देऊ. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गावात फोन केला आणि विचारले की, तुमच्याकडे सोयाबीनचा दर काय? तेव्हा मला माहिती मिळाली की ३८०० रुपये आहे. त्यामुळे लक्षात ठेवा लबाडाचे अवतन जेवल्याशिवाय खरे नसते, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दरम्यान, काँग्रेसचे लोक खोटे आहेत. निवडणुकीपुरते आश्वासन देतात आणि निवडणुकीनंतर त्यांची आश्वासने संपून जातात. मात्र, जनतेचा विश्वास आमच्या पाठिशी आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.