विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 09:37 PM2024-11-19T21:37:17+5:302024-11-19T21:38:08+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विनोद तावडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत या प्रकरणी भाष्य केले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: नालासोपारा विरार भागात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर येथे आले. सगळी परिस्थिती आटोक्यात आणत विनोद तावडे, भाजपा उमेदवार राजन नाईक आणि सहकाऱ्यांना तब्बल चार तासांनंतर सहीसलामत आपल्याच कारमधून हितेंद्र ठाकूर यांनी बाहेर सोडले. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निवडणुकीमध्ये पराभव दिसायला लागतो, त्यावेळी जे प्रकार होतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे. विनोद तावडे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत. ते त्या ठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्याजवळ पैसे सापडलेले नाहीत. कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टी त्यांच्याजवळ सापडलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विनोद तावडे यांची बाजू सावरून धरली.
भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर तिथे हल्ला झाला
आमचे भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर तिथे हल्ला झाला. म्हणूनच महाविकास आघाडीची ही जी काही इकोसिस्टिम आहे, त्या इकोसिस्टिमने उद्याचा दिसणारा पराभव आहे. तो कव्हर करण्यासाठी कव्हर फायरिंग केलेले आहे. विनोद तावडे या प्रकरणात दोषी नाहीत. त्यांनी कोणतेही पैसे नेले नाहीत. त्यांनी कोणतेही पैसे वाटले नाहीत. त्यांच्याकडे कोणतेही पैसे मिळालेले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
विनोद तावडे यांनी दिले स्पष्टीकरण
विरारच्या राड्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. आपण पत्रकार परिषद घेतली त्याचा एक गुन्हा दाखल आहे. माझा मतदारसंघ नसताना मी तिथे गेलो यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. तर हितेंद्र ठाकूर त्या ठिकाणी आले त्यावर तिसरा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पैसे वाटप झाल्याचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या सगळ्या बातम्या खोट्या आहेत. शंका आली तर तुम्ही सीसीटीव्ही तपासा. हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले की भाजपच्या नेत्यांनी टीप दिली. मात्र हे धादांत खोटं आहे. नंतर गाडीतून जाताना त्यांनी मला काय सांगितलं हे मला माहिती आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही. मी प्रचार संपल्यानंतर लोकांना भेटायला जात असतो. त्यामुळे मी राजन यांना फोन केला. त्यांनी मला चहाला बोलवले. तरीही शंका आली असेल तर सीसीटीव्ही तपासा, असे विनोद तावडे यांनी स्पष्टपणे सांगितले.