मोठा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली विनोद पाटील यांची भेट; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 08:28 PM2024-11-09T20:28:03+5:302024-11-09T20:28:43+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाला आरक्षण द्यायचे प्रामाणिक प्रयत्न केले. आरक्षण दिले, टिकवले. मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पाडापाडीचे धोरण जवळपास निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके हेही आक्रमक आहेत. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जरांगे फॅक्टर प्रभावी ठरणार असल्याची चर्चा आहे. जरांगे फॅक्टरचा प्रभाव कमी करण्यासाठी महायुतीकडून अनेकविध प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विनोद पाटील यांच्या भेटीबाबत माहिती दिली. विनोद पाटील आमचे मित्र आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायचा विषय होता, त्यावेळेस विनोद पाटील यांची विशेष मदत झाली. मराठा समाजाला आरक्षण कसे द्यायचे, कसे टिकवायचे याबाबत त्यांची मदत झाली. उच्च आणि सर्वोच्च न्यायालाय याचिका असताना विनोद पाटील यांनी मदत केली. त्यामुळे संभाजीनगरमध्ये असताना त्यांची भेट घ्यायला आलो. ही राजकीय भेट नाही तर कौटुंबिक भेट आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला
भाजपाचे उमेदवार पाडण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील अनेकदा देतात. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आमचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. संधी मिळाली, त्यावेळेस मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला. त्यांनी भूमिका मांडल्यानंतरच आमची भूमिका मांडू. आम्ही आमचे काम करत आहोत. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे प्रामाणिक प्रयत्न केले. आरक्षण दिले आणि टिकवले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लाख तरुणांना रोजगार दिले. सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेसाठी मदत केली. त्यामुळे कुणी किती टीका केली, वाद केला तरी त्याकडे दुर्लक्ष करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आमच्या समोर जे लोक आहे, त्यांनी मराठा समाजासाठी काही केले नाही. ४० वर्षे जे सत्तेत होते, त्यांनी कधी मराठा आरक्षणाच्या विषयाला हात घातला नाही, कधीही प्रयत्न केला नाही. उलट मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असे ते म्हणाले. राजकारणात एक निवडणूक कुणाचे भविष्य ठरवत नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात. विनोद पाटील यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत. त्यांनी सातत्याने राजकीय पेक्षा सामाजिक भूमिका स्वीकारली. जर पूर्णपणे राजकीय भूमिका स्वीकारली त्यावेळी चित्र वेगळे असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.