भाजपाच्या संकल्पपत्रातील 'भावांतर योजना' शेतकऱ्यांना भावली; शेतमालाच्या भावाची हमी मिळाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 05:03 PM2024-11-12T17:03:18+5:302024-11-12T17:05:57+5:30

Bhavantar Scheme, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने आपल्या संकल्पपत्रात भावांतर योजनेचा उल्लेख केला आहे. यासोबतच संपूर्ण कर्जमाफी, कृषिपंपांना मोफत विजेची ग्वाहीदेखील दिली आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 BJP Manifesto Bhavantar Scheme for farmers gets appreciation | भाजपाच्या संकल्पपत्रातील 'भावांतर योजना' शेतकऱ्यांना भावली; शेतमालाच्या भावाची हमी मिळाली!

भाजपाच्या संकल्पपत्रातील 'भावांतर योजना' शेतकऱ्यांना भावली; शेतमालाच्या भावाची हमी मिळाली!

Bhavantar Scheme, Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर शेतमालांचे भाव कोसळतात. नंतर दरवाढ झाली तरी शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांचा तोटा वाढत जातो. दरवर्षी शेतकऱ्यांसमोरील ही अडचण दूर करण्यासाठी महायुतीने ‘भावांतर’ योजनेची घोषणा केली आहे. बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असला तरी शेतकऱ्यांना फटका बसणार नाही. बाजारातील दर आणि हमीभाव यामधील फरकाची रक्कम सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली जाणार आहे. या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शेतकऱ्यांना त्याच्या मालाला पहिल्यांदा भावाची हमी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सात दिवस उरले असल्याने बडे नेते सभांच्या माध्यमातून वातावरण तापवित आहेत. या सभांमध्ये शेतकरी हा विषय केंद्रस्थानी आहे.

भाजपाने आपल्या संकल्पपत्रात भावांतर योजनेचा उल्लेख केला आहे. यासोबतच संपूर्ण कर्जमाफी, कृषिपंपांना मोफत विजेची ग्वाहीदेखील दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्यातील सभेत भावांतर योजनेचा उल्लेख केला. मागच्या काळात कापूस, सोयाबीनचे भाव कोसळले. यातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना आणली. हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. येत्या काळात हमीभावापेक्षा कमी दर शेतकऱ्यांना मिळाल्यास यातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार, असे वचनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यानंतरही आपल्या सभांच्या माध्यमातून फडणवीस यांनी भावांतर योजनेची माहिती दिली.

राज्याच्या ग्रामीण भागातील विधानसभा निवडणूक प्रचारावर भाजपने सध्या शेतकरी विषयांवर फोकस ठेवला आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका महायुतीला  लोकसभा निवडणुकीत बसला होता. भावांतर योजनेसारख्या घोषणांमुळे विधानसभेत शेतकरी सुखावला आहे,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ‘भावांतर योजनेमुळे शेतकऱ्यांची बाजारात होणारी लूट थांबेल, शेतमालाला योग्य भाव मिळण्याची शाश्वती राहील आणि बाजारातील किमतीच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही,’ असे भाजप किसान मोर्चाचे सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील यांनी सांगितले. तर राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ‘शेतमालाला हमी भाव मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना नेहमीच सतावत असते. पण, भावांतर योजनेमुळे ही चिंता कायमची दूर होणार’, असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला.

६२ लाख शेतकऱ्यांना लाभ

महायुती सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा देत भावांतर योजना काही महिन्यांपूर्वीच राज्यात लागू केली. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात थेट मिळाले. दोन हेक्टरच्या मर्यादेत हा दिलासा देण्यात आला. राज्याचा विचार करता जवळपास ६२ लाख शेतकऱ्यांना २,७०० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस, सोयाबीनला हमीभावापेक्षा बाजारात कमी दर मिळाल्यास यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना सरकार देते. आता केवळ कापूस, सोयाबीन उत्पादकच नव्हे तर अन्य शेतमालांसाठीही भावांतर योजना लागू केली जाणार आहे,’ असे भाजपने आपल्या संकल्पपत्रात म्हटल्याने शेतकरी सुखावला आहे.

सोयाबीनला सहा हजारांचा भाव मिळणार

दिवाळीच्या दिवसांत सोयाबीनची विक्री करून शेतकरी खरेदी करतो. रब्बी हंगामातील पेरणीची तजवीजही याच पिकातून साधारणत: केली जाते. या पिकाला चार-साडेचार हजार रुपयांचा भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत होता. पण, भाजपने आपल्या संकल्पपत्रात सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपयांचा दर घोषित केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या विक्रीसाठीचा मुहूर्त साधारण महिनाभरावर ढकलला आहे. सोयाबीन उत्पादक भागात या सहा हजार रुपयांच्या भावाची चर्चा वाढली आहे.

Web Title: Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 BJP Manifesto Bhavantar Scheme for farmers gets appreciation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.