“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 05:30 PM2024-11-22T17:30:46+5:302024-11-22T17:30:56+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत. ते आपला ट्रॅक बदलू शकतात, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना आता राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यातच आता नारायण राणे यांनी मोठे विधान केले आहे.
संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. बाळासाहेब ठाकरे असताना १९९५ ला आम्ही सत्तेत गेलो. आता वर्चस्व कुठे आहे? थोड्या दिवसांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना रस्त्याने चालणे कठीण होईल. आम्ही येतोय हा सगळा दिखावा आहे. आता निकालाला काही तास शिल्लक आहेत. सत्ता स्थापनेची राऊतांना घाई लागली आहे. परंतु, आमची महायुतीच सत्तेवर येणार आहे. भाजपाच्या सर्वात जास्त जागा असतील, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात
शरद पवार दोन तऱ्हेचे आहेत. कुठल्याही क्षणी त्यांच्या पक्षातील आमदारांच्या हितासाठी शरद पवार राज्याच्या हिताचा निर्णय घेऊ शकतात, असे मला वाटते. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार आपला ट्रॅक बदलू शकतात. ते कोणत्याही बाजूला जाऊ शकतात. शरद पवार हे उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत राहणार नाहीत. शरद पवार महायुतीसोबत हातमिळवणी करु शकतात. त्यामुळे राज्यात कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार नाही आणि उद्धव ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असा मोठा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
दरम्यान, विधानसभा निकालानंतर शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देऊ शकतात किंवा दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही याबाबतचे दावे केले जात आहेत. शरद पवार यांनी खरोखरच महायुतीसोबत हातमिळवणी केल्यास ती महाराष्ट्राच्या राजकारणाला पूर्णपणे कलाटणी देणारी घटना ठरू शकेल. त्यामुळे आता काय घडणार, याकडे संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्याचे सांगितले जात आहे.