“स्वतःला भावी CM म्हणता, आधी आमदार तर व्हा”; राधाकृष्ण विखे पाटलांचा थोरातांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 03:05 PM2024-10-29T15:05:16+5:302024-10-29T15:11:10+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: दहशतवादाचे बीज तुम्ही रोवले. विकासाची दृष्टी ठेवून काम करावे लागते. कोणताही निर्णय करताना त्याला धाडस लागते. जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला वेग आला आहे. संगमनेर तालुक्यात सुजय विखे यांच्या सभेमध्ये वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत दखल घेतली. विरोधकांनीही कडाडून विरोध आणि निषेध व्यक्त केला. यामुळे संगमनेर येथे सुजय विखे यांचा पत्ता कट झाला आणि ही जागा शिंदे गटाला सुटली, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यातच बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजय विखे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी पलटवार केला आहे.
विधानसभा निवडणुकीत संगमनेर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघांत आता जनताच न्यायाधीश होईल. या दोन्ही तालुक्यांतील विकासकामांची जनतेने तुलना करावी. दहशत नेमकी कोणत्या तालुक्यात आहे, याचाही फैसला करावा. संगमनेर तालुका हा विचारांचा, चळवळीचा तालुका आहे. या तालुक्याच्या नादाला लागू नका. पक्ष बदलला की, त्यांचे तत्त्वज्ञान बदलते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांनी ६० वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. केवळ विकासाला खोडा घातला, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली होती. याला आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणता, आधी आमदार तर व्हा
विकासाची दृष्टी ठेवून काम करावे लागते. कोणताही निर्णय करताना त्याला धाडस लागते, नुसत हसून चालत नाही. आता जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून पाण्याचा कायदा संगमनेरवाल्यांनी केला. दहशतवादाचे बीज तुम्ही रोवले. संगमनेरच्या घटनेबाबत आम्ही माफी मागीतली, तुमची ती दानत नाही. तुमचा भाऊ आणि तुमचा स्वीय सहायक लाठ्या काठ्या घेऊन होते, मग दहशतवाद कुणाचा? जनता त्यांच्या पाठीशी नाही. वैफल्यातून त्यांच्याकडून हे सगळे प्रकार सुरू आहे. त्या दिवशी सुजयला मारण्याचा कट होता, मी त्याचा जाहीर निषेध करतो. तुम्ही स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणतात, अगोदर आमदार तर व्हा, असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद असल्याचे दिसून आले आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, मी तुम्हाला पाठिंबा देतो,’ असे आवाहन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या महाविकास आघाडीमधील दोन प्रमुख घटक पक्षांना केले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल, असे वक्तव्य केले होते. यानंतर बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे भावी मुख्य मुख्यमंत्री होणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. यावरून राधाकृष्ण विखे पाटील टोलेबाजी केली.