Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 07:06 PM2024-11-20T19:06:33+5:302024-11-20T19:14:28+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: महाविकास आघाडीत सर्वांत मोठा पक्ष कोणता असेल, ठाकरे गटाला किती जागा मिळू शकतील? एक्झिट पोलची आकडेवारी जाणून घ्या...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ तारखेला लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. तत्पूर्वी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले होते. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता एक्झिट पोल येत आहे. विविध एक्झिट पोलमधून धक्कादायक अंदाज वर्तवण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाल्याचे पाहायला मिळाले. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. एक्झिट पोलमधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबाबत काही संकेत मिळत आहेत.
भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, यंदाच्या निवडणुकीत महायुती बाजी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या निवडणुकीत महायुतीला १५२ ते १६० जागा मिळू शकतात, असे म्हटले गेले आहे. भाजपा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. भाजपाला ९० जागा, शिवसेना शिंदे गटाला ४८ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला २२ जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीत सर्वांत मोठा पक्ष कोणता ठरणार?
चाणक्य एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागांवर विजय मिळू शकतो. महाविकास आघाडीत काँग्रेस ६३ जागा मिळवत सर्वांत मोठा पक्ष ठरू शकेल. तर, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ४० जागा आणि ठाकरे गटाला ३५ जागांवर विजय मिळू शकतो, अशी शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तर अपक्षांना ६ ते ८ जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता चाणक्यच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आली आहे.