“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 04:47 PM2024-11-20T16:47:49+5:302024-11-20T16:52:16+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Bitcoin Scam: हे असले उद्योग करून भाजपला आपला पराभव टाळता येणार नाही, असा पलटवार बाळासाहेब थोरात यांनी केला.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Bitcoin Scam: एकीकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया होत असताना दुसरीकडे बिटकॉइन स्कॅमचा मुद्दा चांगलाच गाजताना पाहायला मिळत आहे. माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरणे तसेच निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला आहे. यानंतर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही काही ऑडिओ क्लिप शेअर करत आरोप केले. राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर तोंडसुख घेतले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून कट कारस्थाने रचून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी एका प्रकरणातील आरोपीला माजी आयपीएस अधिकारी म्हणून प्रोजेक्ट करून त्याच्या तोंडून खोटे नाटे आरोप करवून घेतले जात आहेत. व त्या आधारे भाजप नेते माध्यमांसमोर जाऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बेफामपणे खोटे आरोप करत आहेत, या शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी निशाणा साधला.
भाजपला आपला पराभव टाळता येणार नाही
महाराष्ट्रातील जनतेला भाजपच्या या कट कारस्थानाची आणि कपटनितीची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हे असले उद्योग करून भाजपला आपला पराभव टाळता येणार नाही. भाजपच्या या कारस्थानाला राज्यातील सुज्ञ जनता सणसणीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका थोरात यांनी केली.
दरम्यान, यासंदर्भात योग्य चौकशी व्हायला हवी, असे माझे स्पष्ट मत आहे. या प्रकरणात नेमके काय खरे आहे, हे सर्वांसमोर आले पाहिजे. कारण या प्रकरणी करण्यात आलेले आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातील सत्य बाहेर येणे, हा जनतेचा अधिकार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून कट कारस्थाने रचून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 20, 2024
यासाठी एका प्रकरणातील आरोपीला माजी आयपीएस अधिकारी म्हणून प्रोजेक्ट करून त्याच्या तोंडून खोटे नाटे आरोप करवून घेतले जात आहेत. व त्या आधारे भाजप नेते…