निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 08:09 AM2024-11-22T08:09:20+5:302024-11-22T08:10:12+5:30
डिपॉझिट रक्कम परत करताना एकूण वैध मतांची गणना करताना 'नोटा'ला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत.
Vidhan Sabha Election ( Marathi News ) : निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक उमेदवारांकडून आम्ही त्याचं डिपॉझिट जप्त करून अशी गर्जना केली जाते. डिपॉझिट जप्त म्हणजे नामुष्कीजनक पराभवच; कारण वैध मतांच्या एकषष्ठांशही मते जे उमेदवार मिळवू शकत नाहीत, त्यांचे डिपॉझिट रक्कम जप्त होते. राज्यात यंदा किती उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार, हे उद्या जाहीर होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे पक्षातून उमेदवारी मिळाली नाही तर अनेकजण अपक्ष अर्ज भरतात. काहीजण कोणत्याही पक्षात नसतानाही निवडणूक लढवत असतात. काहीजण प्रत्येक निवडणूक लढवतातच तर काही नवखेही उभे राहतात. सर्वसाधारण गटातील उमेदवारांना १० हजार रुपये, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवारांना पाच हजार रुपये डिपॉझिट रक्कम उमेदवारी अर्ज दाखल करताना जमा करावी लागते. या निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या एकषष्ठांशापेक्षा कमी मते मिळाल्यास डिपॉझिट रक्कम जप्त होणार आहे. डिपॉझिट रक्कम परत करताना एकूण वैध मतांची गणना करताना 'नोटा'ला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत.
'या' उमेदवारांना मिळणार डिपॉझिट रक्कम परत
उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध असल्यास किंवा नाकारले गेल्यास अनामत रक्कम परत मिळते. उमेदवाराने विहित कालावधीत उमेदवारी मागे घेतली तरीसुद्धा अनामत रक्कम परत केली जाते. निवडून आलेल्या उमेदवारालाही अनामत रक्कम परत मिळते. मतदानाच्या प्रारंभापूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीस अनामत रक्कम परत केली जाते.