कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:57 PM2024-10-31T16:57:54+5:302024-10-31T16:58:25+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे रोहित पाटील आणि भाजपामधून अजित पवार गटात गेलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो अनेक पक्षातील नाराज उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकवत सरळ अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. अर्ज माघे घेण्याची अंतिम मुदत अद्याप संपलेली नाही. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ऑफर दिल्या जात आहेत. यातच राज्यातील काही मतदारसंघांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातील एक म्हणजे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ. या ठिकाणी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे.
विरोधकांच्या मतांमध्ये फाटाफूट व्हावी, यासाठी राजकीय नेते, पक्ष विविध माध्यमांतून प्रयत्न करत असतात. एकाच नावाचे उमेदवार निवडणुकीत रिंणगात उतरविणे, ही एक ट्रिक हमखास वापरली जाते. हीच पद्धत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात वापरण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात एकाच नावाचे प्रत्येकी तीन उमेदवार रिंणगात आहेत.
रोहित पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात लढत
मिळालेल्या माहितीनुसार, तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपामधून अजित पवार गटामध्ये आलेल्या माजी खासदार संजयकाका पाटील आहेत. मात्र, रोहित पाटील यांच्या विरोधात रोहित पाटील नावाचेच तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे एक नाव असलेले चार रोहित पाटील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
दरम्यान, रोहित पाटील यांना निवडणुकीमध्ये पाडण्यासाठी खूप प्रयत्न होणार आहेत. आर आर आबा तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात असताना आर आर पाटील नावाचे चार चार उमेदवार निवडणुकीमध्ये असायचे. पूर्वी एखादा माणूस चुकत होता. मात्र आता मतपेटीवर फोटो येणार आहे. त्यामुळे रोहित पाटील यांची छबी दिसणाऱ्या पुढे बटन दाबून मतदान करतील, असे खासदार विशाल पाटील यांनी म्हटले आहे.
----००००----