Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 10:07 PM2024-11-20T22:07:25+5:302024-11-20T22:08:05+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 is manoj jarange patil factor will work again exit poll prediction about big blow to mahayuti and good position of maha vikas aghadi in marathwada | Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?

Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ तारखेला लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. तत्पूर्वी मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले होते. यानंतर आता अनेक एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुन्हा एकदा जरांगे पॅटर्न चालू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सर्व प्रमुख एक्झिट पोल एका क्लिकवर

लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधीपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन सुरू केले. अंतरवाली सराटी येथे पोलीस आणि आंदोलक यांच्यात झालेल्या झटापटीनंतर आणि तेथे झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा एकदम प्रकाशझोतात आला. यानंतर संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण मिळण्यासाठी आंदोलने होऊ लागली. मनोज जरांगे पाटील यांना प्रचंड समर्थन मिळत गेले. प्रचंड मोठ्या जनसमुदायासह मुंबईवर धडक मारण्याचा बेत मनोज जरांगे यांनी आखला होता. परंतु, मुंबईच्या वेशीवरच काही मागण्या मान्य झाल्यामुळे मनोज जरांगे माघारी फिरले होते. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर सर्वाधिक चालल्याचे सांगण्यात आले. अनेक नेत्यांनी तशी कबुलीही दिली. त्यानंतर आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला धक्का बसू शकतो आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.

पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार?

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ते ओबीसीतून मिळावे, तसेच कुणबी प्रमाणपत्र जास्तीत जास्त मिळावीत, यासाठी आमरण उपोषण सुरू केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले. परंतु, त्यानंतरही सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला. यानंतर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लागला. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठवाड्यासह लगतच अधिकाधिक भाग पिंजून काढला. एसएएस ग्रुप हैदराबादच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात महायुतीच्या १२५ ते १३५ जागा मिळू शकतात. तर, महाविकास आघाडीला १४७ ते १५५ जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यातील ४६ जागांपैकी भाजपा महायुतीला १७ ते १८ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला मराठवाड्यात २७ ते २८ जागा मिळू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या एक्झिट पोलनुसार, भाजपा महायुतीला मराठवाड्यात फटका बसून, महाविकास आघाडीचेच पारडे जड राहू शकेल, असा अंदाज आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतली. तसेच मराठा आरक्षणाच्या विरोधात जो कोणी असेल, त्याला पाडा, असे फर्मान सोडले. लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आणि प्रचंड टीकेची झोड सातत्याने उठवली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मराठा आरक्षणाच्या विरोधात जे जातील, त्यांना पाडाच, जागा दाखवा, असाच पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी कायम ठेवला. आयएनएस आणि मॅट्रिझ प्री पोलनुसार, महायुतीला स्पष्ट बहुमत दर्शवण्यात आले होते. यातही मराठवाड्यात भाजपा महायुतीला फटका बसत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता प्रत्यक्षात काय घडणार हे २३ नोव्हेंबर रोजीच सर्वांसमोर येईल.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 is manoj jarange patil factor will work again exit poll prediction about big blow to mahayuti and good position of maha vikas aghadi in marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.