कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 07:41 PM2024-10-26T19:41:45+5:302024-10-26T19:43:10+5:30

कोरेगावमध्ये शशिकांत शिंदेविरुद्ध महेश शिंदे अशी लढत आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Koregaon seat given to NCP, Shiv Sena will contest from Satara constituency says Sanjay Raut | कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती

कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती

sanjay raut news : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघात शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे तर शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान आमदार महेश शिंदे यांना मैदानात उतरवले आहे. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता. मात्र, लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये त्यांनी भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना चांगलीच टक्कर दिली होती. या मतदारसंघातून उदयनराजेंना १०३९२२ तर शशिकांत शिंदेंना ९७०८७ मते मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे या दोन शिंदेंमध्ये चुरशीची लढत होईल यात शंका नाही. आमदार महेश शिंदे यांनी जवळपास सात हजारांचे लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळवून दिले. परंतु, कोरेगावची जागा आम्ही राष्ट्रवादीला सोडली असून, त्याबदल्यात ठाकरे गट सातारा मतदारसंघातून लढणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

काही जागांवरुन महाविकास आघाडीने अदलाबदल केली असल्याचे समजते. यातीलच एक जागा म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ. कोरेगावची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सातारा-जावळी या मतदारसंघातून लढेल. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलत असताना यासंदर्भातील प्रश्नावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, कोरेगावची जागा राष्ट्रवादीला देऊन त्याबदल्यात आम्ही सातारची जागा घेतली. अनेक तास चर्चा करुन आम्ही यादी जाहीर केली आहे. तीन पक्ष सोबत असल्याने काही जागांवर तिढा असणारच. महाविकास आघाडीतील जागा वाटप एवढे सोपे नाही. कोरेगावात राष्ट्रवादीकडे शशिकांत शिंदेंसारखा तगडा उमेदवार असल्याने ती जागा त्यांना देण्यात आली. 

दरम्यान, सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गट कोणाला मैदानात उतरवणार हे पाहण्याजोगे असेल. अमित कदम संभाव्य उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे. त्यामुळे कोरेगावमध्ये तुतारी विरुद्ध धनुष्यबाण तर साताऱ्यात कमळ विरुद्ध मशाल अशी थेट लढत पाहायला मिळेल. 

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Koregaon seat given to NCP, Shiv Sena will contest from Satara constituency says Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.