बाबा सिद्दीकींच्या मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोई लढणार? या पक्षाने निवडणूक आयोगाकडे मागितले एबी फॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 11:39 AM2024-10-26T11:39:11+5:302024-10-26T11:40:19+5:30
निवडणूक आयोगाकडे नोंदणी असणारा पक्ष उत्तर भारतीय विकास सेनेने दोन दिवसांपूर्वी लॉरेन्सला तुझ्यात भगतसिंग दिसत असल्याचे म्हणत निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती.
महाराष्ट्राच्या निवडणुकीत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला लढविले जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडे नोंदणी असणारा पक्ष उत्तर भारतीय विकास सेनेने दोन दिवसांपूर्वी लॉरेन्सला तुझ्यात भगतसिंग दिसत असल्याचे म्हणत निवडणूक लढविण्याची ऑफर दिली होती. आता या पक्षाने निवडणूक आयोगाकडे एबी फॉर्म देण्यासाठी मागणी केली आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे नेते सुनिल शुक्ला यांनी बाबा सिद्दीकींचा मतदारसंघ असलेल्या पश्चिम बांद्रा मतदारसंघातून लॉरेन्स बिश्नोईला निवडणुकीत उतरविणार असल्याचे म्हटले आहे. लॉरेन्स बिश्नोईला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एबी फॉर्मची गरज आहे. याचा पुरवठा करावा अशी मागणी शुक्ला यांनी रिटर्निंग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
लॉरेन्सची सही आम्ही या फॉ़र्मवर घेणार आहोत. त्याने जर मंजुरी दिली तर आम्ही महाराष्ट्र निवडणुकीत आणखी ५० जागांवर उमेदवार देणार आहोत, असे शुक्ला म्हणाले. लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती जेलमध्ये आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येत लॉरेन्सचा हात आहे. शुक्ला यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. शुक्ला हे खार पोलीस ठाण्यात गेले होते. तिथून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे जात बलकरण बराड या नावाने एबी फॉर्म मिळण्यासाठी अर्ज केला आहे. लॉरेन्सचे खरे नाव बलकरण बराड असे आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगविरोधात मुंबई, दिल्ली आणि पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई सुरु केली आहे. दिल्ली पोलिसांनी लॉरेन्स गँगच्या सात गुंडांना अटक केली आहे. तर मुंबई-पंजाब पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनेकांना अटक केली आहे.