लक्ष्मण हाकेंचे शब्द खरे ठरले? मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; प्रतिक्रिया देत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 10:55 AM2024-11-04T10:55:00+5:302024-11-04T10:56:42+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: जत्रा भरवणे सोपे असते, निवडणूक लढवणे नाही. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जाते. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असे सांगत लक्ष्मण हाके यांनी जरागेंवर टीका केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 laxman hake first reaction about manoj jarange patil decision not to contest election | लक्ष्मण हाकेंचे शब्द खरे ठरले? मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; प्रतिक्रिया देत म्हणाले...

लक्ष्मण हाकेंचे शब्द खरे ठरले? मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; प्रतिक्रिया देत म्हणाले...

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणूक प्रक्रिया पुढे जात आहे, तसा राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजताना दिसत आहे. यातच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ओबीसी आरक्षण टिकावे, यासाठी आंदोलन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीला उभे राहणार नाहीत, अशा आशयाचे दावे लक्ष्मण हाके यांच्याकडून केले जात होते. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे याबाबतही सांगितले होते. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. त्यामुळे एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. यावर लक्ष्मण हाके यांनी भाष्य करताना मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

जत्रा भरवणे सोपे असते, निवडणूक लढवणे नाही

जत्रा भरवणे सोपे असते, पण निवडणूक लढवणे सोपे नाही. जरांगे नावाचे वटवाघूळ स्वत:च्या औकातीवर आले. जे उमेदवार देणार आहेत, तेथील उमेदवार त्यांना येऊन भेटले आहेत. म्हणून त्या मतदारसंघांची नावे घेऊन मोकळे झाले आहेत. तिथे उमेदवार मिळणार नाहीत. मिळाले तर एकदम तकलादू असतील. कोणाला तरी पाडण्यासाठी, कोणाला तरी निवडून आणण्यासाठी बारामतीच्या सांगण्यावरुन उमेदवार दिले असतील. त्यांच्या या उमेदवारांमध्ये काही ताकद नाही. एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझे एवढे राजकीय आकलन आहे. राजकीय प्रक्रिया हाताळणे ही साधी गोष्ट नाही. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जाते. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली. 

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा, मुस्लिम आणि दलित अशी त्रिसूत्री घेत या बैठकीत २५ मतदार संघावर चर्चा करण्यात आली. रात्री १४ मतदार संघ ठरवून मराठा समाजाचे उमेदवार अंतिम करायचे होते. इतर ठिकाणी मुस्लिम, दलित मित्रपक्षातील उमदेवार देण्यावर चर्चा करण्यात आली. सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची, एका जातीवर निवडणूक लढायची का यावर चर्चा करण्यात आली. परंतु, मित्रपक्षाची यादी सकाळी ९ वाजले तरी आलेली नाही. यादी आली नसली तरी ते मित्रपक्ष आपलेच आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांनी समाजाच्या जीवावर निवडणूक लढविता येत नाही. महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कोणी आमच्या कामाचे नाही. त्यामुळे कोणाला पाडा आणि कोणाला आणा म्हणण्यात अर्थ नाही. तुमच्या मतदारसंघात तुम्हाला ज्याला मदत करायची त्याच्याकडून 'मी तुमच्या मागण्यांशी सहमत आहे', असे लिहून घ्या, असे आवाहन केले.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 laxman hake first reaction about manoj jarange patil decision not to contest election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.