“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 08:44 PM2024-11-22T20:44:16+5:302024-11-22T20:44:36+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा हवा असेल, तर काय अपेक्षा आहेत, याची यादीच महादेव जानकर यांनी वाचून दाखवली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडी समोर पाठिंबा हवा असल्यास काही मोठ्या अटी ठेवल्या आहेत.
महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू-भगिनींचे आभार मानतो. लोकशाहीचा उत्सवामध्ये मतदारांचा टक्का वाढल्यामुळे अभिनंदन करतो. जो टक्का वाढलेला आहे तो परिवर्तनाची शक्यता असू शकते. मागच्या विधानसभेत माझा एक आमदार होता आणि वरच्या सभागृहात एक असे दोन आमदार होते. पण आता आमचे दोनाचे चार, चाराचे सहा वाढतील. जनतेचा कौल शेवटी, त्यांच्या हातात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास आहे, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु
मेजॉरिटी महाविकास आघाडी किंवा महायुतीला असेल तर आमचा कोणाला विरोध असेल असे नाही. सध्या महाविकास आघाडी बरोबर जायला तयार आहोत, महायुती बरोबर पण जायला तयार आहोत. सध्यातरी ५०-५० टक्के दोघांची शक्यता आहे. आम्ही महायुती बरोबर पण नाही आणि महायुती बरोबर पण नाही. आम्ही छोटे पक्ष असल्यामुळे किंगमेकरची भूमिका बजावणार आहोत, असे जानकर यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून आम्हाला कोणाचे निमंत्रण किंवा फोन आलेला नाही. आम्हाला मंत्रिमंडळात भागीदारी पाहिजे, आमची इच्छा आहे. जर आमचे १२ आमदार आले तर १२ चे १२ कॅबिनेट मिनिस्टर झाले पाहिजे. जर दोघांना वाटले तर मुख्यमंत्री आमचा पक्षाचा झाला पाहिजे. त्यांनी हे मान्य केले तर आम्ही त्यांना वेलकम करू. तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा, अशा अटी जानकर यांनी ठेवल्या.
दरम्यान, ज्याचा पक्षाच्या आमदारांवर ज्यांना विश्वास नसेल त्या पक्षांनी हॉटेल बुक केले आहे. पण माझ्या पक्षाचे जे आमदार निवडून येतील, त्यांच्यावर मला विश्वास आहे. माझ्या पक्षाचे आमदार बाहेर जाणार नाहीत. जर वेळ आली तर ताज हॉटेल बुक करायला आम्ही पण सक्षम आहोत, असे जानकर यांनी स्पष्ट केले. ते टीव्ही९शी बोलत होते.