“देवेंद्र फडणवीसांनी बेजार केले म्हणून लढतो, आम्हाला नाद नाही”; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 01:07 PM2024-11-03T13:07:43+5:302024-11-03T13:07:54+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचे काही सांगत नाही. आपल्याला आधार पाहिजे. आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 manoj jarange patil criticized bjp dcm devendra fadnavis | “देवेंद्र फडणवीसांनी बेजार केले म्हणून लढतो, आम्हाला नाद नाही”; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

“देवेंद्र फडणवीसांनी बेजार केले म्हणून लढतो, आम्हाला नाद नाही”; मनोज जरांगेंची पुन्हा टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून त्या त्या पक्षातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आणि मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी पाहायला मिळाला. आता विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे फॅक्टर किती चालतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगेंसोबत सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि पदाधिकारी यांच्या भेटी वाढत आहेत. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक व उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मराठा बांधवांनी तातडीने एकत्र बसून बैठक घ्यावी. या बैठकीत मिळून एक उमेदवार ठरवावा. आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. ओढाताणीच्या नादात ही संधी घालवू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. राखीव मतदारसंघात दलित समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार आहे. इतर ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार असतील. इतर छोट्यामोठ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

देवेंद्र फडणवीसांनी बेजार केले म्हणून लढतो, आम्हाला नाद नाही

मी नवीन आहे. त्यामुळे जागांबाबत वेळ लागतो. एक-दोन प्रश्न किचकट आहे. मी सर्वांना सांगितले आहे. माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचे काही सांगत नाही. मला काही माहीत नाही. मी त्यांच्या खांद्यावर मान टाकू शकतो. पण आमचे मराठे १०० टक्के एकत्र राहणार आहे. आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी बेजार केले म्हणून लढत आहोत. आम्हाला नाद नाही. आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे. त्यालाच मराठा म्हणतात, असे मनोज जरांगे यांनी सांगत निशाणा साधला.

दरम्यान, राजकारणाचे वेड लागू देऊ नका. आमदार, खासदार होण्याची स्वप्न पाहू नका. आपल्याला समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही. आपल्याला आधार पाहिजे. आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 manoj jarange patil criticized bjp dcm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.