“बोटांवर मोजण्याइतकी मराठा मते”; लोणीकरांच्या विधानावर मनोज जरांगे संतापले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:08 PM2024-11-12T18:08:14+5:302024-11-12T18:08:38+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानावर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार, असे दावे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच आता बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त शब्दांत प्रतिक्रिया दिली.
आष्टी गावात अठरापगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची मते बोटांवर मोजण्याइतकी आहेत. मात्र हे गाव सर्व समाजांचे गाव आहे. सगळ्या जाती-धर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत. मराठा, धनगर, माळी, फुलारी, आगलावे, शेंडे, कांबळे सगळे आहेत, असे बबनराव लोणीकर एका व्हिडिओत म्हणताना पाहायला मिळत आहेत. यासंदर्भात मनोज जरांगे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली.
या नेत्यांच्या अशा वागण्याने मराठा समाज अडचणीत
हे विधान खेदजनक आहे. या नेत्यांच्या अशा वागण्याने मराठा समाज अडचणीत यायला लागला आहे. अशा लोकांना मराठा समाजाने थारा देऊ नये. त्यांना धडा शिकवला पाहिजे. त्याशिवाय ते जागेवर येणार नाही. त्यांना रस्त्यावर आणण्याची ताकद केवळ मराठा समाजात आहे, त्यांना समाज नक्कीच रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, माझ्या भाषणात म्हणालो की, मराठा समाजाची मते या गावात कमी आहे. गाव एससी, एसटी, एनटी, व्हिजेएनटी, ओबीसी, मुस्लिम अशा अठरापगड जातींचे गाव आहे. ४० वर्षे या गावाने भाजपाला मताधिक्य दिले आहे. मराठा समाजाची ६० ते ७० टक्के मते मला मिळतात. काँग्रेसमधून हकालपट्टी झालेल्या लोकांनी मोडतोड करुन व्हिडीओ व्हायरल केला आहे. तो खोटारडेपणा आहे, असे स्पष्टीकरण बबनराव लोणीकर यांनी यासंदर्भात दिल्याचे सांगितले जात आहे.