“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:36 PM2024-11-06T16:36:34+5:302024-11-06T16:39:20+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: प्रामाणिक सांगतो की, त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी सूचना मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना केली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. लातूर येथील सभेत राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना काही प्रश्न करत टीका केली. या टीकेचा खरपूस शब्दांत मनोज जरांगे यांनी समाचार घेतला.
सर्व राजकीय पक्ष तुम्हाला झुलवत ठेवत आहेत. ते तुमच्याकडे आले तर त्यांना विचारा की आरक्षण कसे देणार हे आधी सांगा. जिल्ह्याजिल्ह्यांत मोर्चे निघाले होते, त्या मोर्च्यांचे काय झाले? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळाले? आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात. म्हणतात आता निवडणुका लढवू. नंतर म्हणतात आता निवडणुका नाही लढवणार, आता पाडणार. तुम्हाला लढवायच्या तर लढवा. पाडायच्या तर पाडा. प्रश्न एवढाच आहे की, हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, या गोष्टी तुमच्याशी अत्यंत विचारपूर्वक बोलतोय. मी सत्य परिस्थिती तुमच्यासमोर मांडतोय. हीच सत्य परिस्थिती मी ज्यावेळी जरांगे पाटलांना भेटायला गेलो, त्यावेळी मी त्यांच्यासमोर मांडली होती, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यावर मनोज जरांगे यांनी पलटवार केला.
तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे हे माहिती आहे
आरक्षण कसे देणार माझ्या सामाजाला माहिती आहे, ते तुम्हाला कळणार नाही. आरक्षण काय आणि लढा टिकवणे काय असते तुम्हाला काय माहिती? तुम्हाला अस्तित्व कसे संपवायचे हे माहिती आहे. पण अस्तित्व कसे टिकवायचे हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी त्या भानगडीत पडू नये, त्यांना मानणारा आमचा एक वर्ग आहे. प्रामाणिक सांगतो की, त्यांनी या भानगडीत पडू नये. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊ नये, अशी माझी त्यांना सूचना आहे. आरक्षण कसे मिळते, ते मला माहिती आहे, ते तुम्हाला माहिती नाही, तुम्ही त्या वेळी झोपेत होते का, मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी समाज एकसंध ठेवला. त्यांच्यासारखे पक्ष काढून समाजाला तात्पुरता आनंद द्यायचा नव्हता. त्यांना हे सगळे बोलायचा ठेका देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
दरम्यान, हे होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला माहिती आहे. जे तुम्हाला येऊन सांगताहेत ना की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. आले की पहिल्यांदा विचारा कसे? मागे मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले जा, दिले आरक्षण! म्हणजे काय? तुमच्या हातात तरी आहे का ते? हे राज्य सरकार देऊ तरी शकते का? कोणतेही राज्य सरकार देऊ शकते का? तामिळनाडूत असा प्रकार झाला. तामिळनाडू सरकारने सांगितले आरक्षण दिले. तो विषय सर्वोच्च न्यायालयात पडलेला आहे. त्याचा काहीही निकाल लागलेला नाही. जी गोष्ट घडू शकत नाही. जी गोष्ट होऊ शकत नाही, त्यावर आपण भांडतो आहोत, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.