...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 05:14 PM2024-11-05T17:14:56+5:302024-11-05T17:15:02+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे. हाच आमचा मूळ उद्देश आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आम्ही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीत उमेदवार द्यायचा नाही. आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यातच आता एक ते दोन दिवसांत पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला संकटात टाकायचं नाही. दहा-वीस लोक राजकारणात जायचे बोलत होते. मला राजकारणाचा नाद असता तर ५० उमेदवार उभे केले असते. माझी ताकद दिली असती. माझा राज्यात दबदबा झाला असता. माझा स्ट्राइक रेट तो नाही. माझा स्ट्राइक रेट म्हणजे मराठा समाज आहे. मला राजकारणाचा नाद नाही, मला गरिबाला सांभाळायचे आहे. मराठा समाजाच्या अनेक मोठमोठ्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले होते. पण त्यांनी एका शब्दांत अर्ज मागे घेतले. याचाच अर्थ त्यांनी समाजाचा विश्वासघात केला नाही, असे मनोज जरांगे यांनी नमूद केले.
दोन दिवसांत पुढील दिशा सांगणार आहे
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता कुणाला पाडण्याची भूमिका घेणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ते होईलच, दोन दिवसांत समाधान होईल. मी काहींना काही दिशा सांगणार आहे. माझ्या समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही. मी योग्यच करणार आहे. मराठा समाजाने मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास ठेवावा. शांत राहावे. इमानदार रक्त आहे, बेईमानी करणार नाही. टेन्शन घ्यायचे नाही, असे सूतोवाच मनोज जरांगे पाटील यांनी केले.
दरम्यान, सहा कोटी मराठे आहेत. पण तरीही केवळ पाच-दहा आमदार निवडून आले असते तर समाजाने खाली मान घालून जाणे सहन झाले नसते. आम्ही निर्णय काय एवढा वाईट घेतला का? निवडणूक लढवायची नाही. संपला विषय. आमचा काही राजकारण हा खानदानी धंदा नाही. आम्ही राजकारणासाठी आलो का? मला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे. हाच आमचा मूळ उद्देश आहे, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.