“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:00 AM2024-10-25T10:00:59+5:302024-10-25T10:03:20+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: खडकवासला मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. मी रडणार नाही, लढणारा आहे, असे मयुरेश वांजळे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी दिला होता. परंतु, आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. मनसेकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी उमेदवार घोषित केले जात आहेत. मनसेकडून पहिल्यांदा ७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मनसेकडून ४५ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यानंतर मनसेने १३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. आतापर्यंत मनसेकडून ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यातच दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर प्रतिक्रिया देताना मयुरेश वांजळे यांनी राज ठाकरे यांच्यासंदर्भातील एक भावूक आठवण सांगितली.
खडकवासला मतदारसंघातून मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सन २००९ मध्ये खडकवासला मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर आमदार रमेश वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. आमदार असताना रमेश वांजळे यांनी मनसे स्टाइलने अनेक आंदोलने केली. विधिमंडळही चांगलेच गाजवले होते. २०११ मध्ये रमेश वांजळे यांचे निधन झाले. त्यानंतर पोटनिवडणूक पार पडली. त्यावेळी भाजपाने माजी नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली. रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांच्याविरोधात तापकीर ३ हजार ६२५ मतांनी जिंकले. यानंतर खडकवासला मतदारसंघ भाजपाच्या हाती आला. खडकवासला मतदारसंघात भाजपाला मानणारा मोठा मतदार आहे. सन २०११, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांमध्ये तापकीर सलग विजयी झाले.
मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते
उमेदवारीबाबत बोलताना राज ठाकरे काय म्हणाले होते, असा प्रश्न मयुरेश वांजळे यांना विचारण्यात आला. यावर, जसे वाघाचे काम होते, तसेच तुझे काम आहे. तू याच कार्यपद्धतीने पुढे चालत राहा, असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंना भेटायला गेलो तेव्हा मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले, ते म्हणाले मला वाटले माझा रमेशच आला, अशी आठवण मयुरेश वांजळे यांनी सांगितली.
दरम्यान, खडकवासला मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. त्यामध्ये महत्वाचा म्हणजे रोजगार. मला खडकवासलामध्ये लवकरात लवकर एमआयडीसी आणायची आहे. मला वडिलांची आठवण आल्यावर नेहमी अश्रू अनावर होतात. मात्र मी रडणारा नाही, लढणारा आहे. माझे अश्रू रोखून ठेवले आहेत. आता ज्या दिवशी मी जिंकणार त्याच दिवशी अश्रूंना वाट मोकळी करून देणार, असे मयुरेश वांजळे यांनी स्पष्ट केले. ते एबीपीशी बोलत होते.