“सगळे शक्य, फक्त इच्छा हवी, सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही, पण...”; राज ठाकरेंचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 03:15 PM2024-11-09T15:15:32+5:302024-11-09T15:18:07+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०२४ साठी विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या, असे सांगत मनसेला मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी केले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीचे केंद्रातील आणि राज्यातील नेते राज्यभर प्रचारसभा घेत असून, महाविकास आघाडीचे केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व महाराष्ट्रभर सभा घेताना पाहायला मिळत आहे. मनसे पक्षही यात मागे नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यभर दौरा करत असून, अनेक ठिकाणी प्रचारसभा घेताना पाहायला मिळत आहेत. यावेळी राज ठाकरे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांवर टीका करत आहेत.
उमरखेड येथील प्रचारसभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या ही उमरखेडमध्ये झाली होती. शेतकरी आत्महत्या करतोय, त्यांना बघायला कोणी येत नाही. त्यांचे कुटुंब काय करते ते ही बघत नाही. कारण आता माणसाची काही किंमतच उरली नाही. आमची मने मेली आहेत. जर तुम्ही जिवंत आहात असे वाटत असेल तर आजवर ज्यांना मत दिली त्यांना नाकारा आणि मनसेला मतदान करा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
सगळे शक्य, फक्त इच्छा हवी, सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही, पण...
आमच्याकडे तरुण तरुणी जिल्हा सोडून जात आहेत. आमदार खासदार यांना विचारत नाही. निवडणूक खेळ समजतात. निवडणूक झाली की आम्ही विसरून जाणार. यानंतर ५ वर्षांनी पुन्हा निवडणूक होणार. विकास कसा होतो, हे पाहिले आहे. नाशिकमध्ये रस्ते बनवले. किती वर्षे झाले पाहा, अजूनही ते तसेच आहेत. कंत्राटदारकडून टक्के घेणे बंद झाला की, रस्ते चांगले होतात. रस्त्यात खड्डा दिसला तर खड्ड्यात बांधून मारेन असा दम मी कंत्राटदारला दिला होता, असे सांगत, सगळ्या गोष्टी शक्य आहे. फक्त इच्छा पाहिजे. सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही. पण महाराष्ट्राच्या विकासाची नक्कीच स्वप्न पडतात. राज्यकर्ते आणि राजकारणाच्या मेंदूत कमतरता आहे. २० नोव्हेंबर ही तारीख जवळ आली आहे. अशी संधी सारखी मिळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, तुमच्या दूध, पाणीपट्टीचे दर हे राजकारणी ठरवितात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २०२४ साठी विकास आराखडा तयार केला आहे. बाकीच्यांना पुढची काही वर्षे आराम करू द्या, असा टोल राज ठाकरे यांनी लगावला. माणसाची किंमत देशात नाही परदेशात जाऊन कळते. अमेरिकचे राष्ट्रध्यक्ष ओबामा हे पदावरून खाली उतरत असताना त्यांनी एक कायदा केला होता. जेवढे कुत्रे बॉम्बस्फोटात जातील, त्यांना तुम्हाला परत अमेरिकेत आणावे लागेल. ज्या देशात कुत्र्यांची काळजी आहे तर माणसाची किती असेल? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थितांना केला.