“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 08:39 PM2024-11-18T20:39:48+5:302024-11-18T20:40:44+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पण मग तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp ajit pawar group dilip walse patil challenge opposition | “...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान

“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. प्रचारतोफा थंडावल्या आहेत. आता मतदानादिवशी जनतेचा कौल कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे. 

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केल्यानंतर अनेक नेते, आमदार त्यांच्यासोबत आले. त्यापैकी दिलीप वळसे पाटील हे आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरवले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात जोरदार प्रचारसभा घेत खुद्द शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना पाडण्याचे आवाहन केले. यानंतर दिलीप वळसे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले. तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिलीप वळसे पाटील यांनी खुले आव्हान दिले आहे. 

...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन

काही लोक म्हणतात अटक होणार होती, काही म्हणतात ईडी आणि सीबीआयची नोटीस आली होती. म्हणून त्यांनी शरद पवारांना सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले. मात्र मी यापूर्वी सांगितले आहे की, मला ईडी, सीबीआय अथवा अन्य कोणत्या एजन्सीची नोटीस आलेली नाही. जर कोणी त्या संदर्भातील पुरावा आज रात्रीपर्यंत आणून द्यावा, मी उद्या सकाळी माझी उमेदवारी मागे घेतो. विरोधक म्हणतात माझी नार्को टेस्ट करा, बिनधास्त करा. पण माझी ही करा आणि देवदत्त निकमांचीही नार्को टेस्ट करा. माझ्या नार्को टेस्टमध्ये काय बाहेर पडेल याची मला कल्पना आहे, पण तुम्हाला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी टीका दिलीप वळसे पाटील यांनी केली. 

दरम्यान, आता विरोधक म्हणाले महिला असुरक्षित आहेत, मग करू न आपण सगळी चौकशी. बदलापूर पासून ते नागापूरपर्यंत सगळी चौकशी करूया. यांना गावातील एक पतसंस्था चालवता आली नाही आणि हे विधानसभा तसेच राज्य चालवायची भाषा करत आहेत. विधानसभा अध्यक्ष असताना आमदारांना थांबवायचो, पण मला लोक थांबवत आहेत. पण काही हरकत नाही, शेवटचा श्वास असेपर्यंत तुमच्या पाण्यासाठी लढा देत राहीन, असा शब्द दिलीप वळसे पाटील यांनी दिला.

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp ajit pawar group dilip walse patil challenge opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.