“कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?”; शरद पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 05:48 PM2024-11-14T17:48:13+5:302024-11-14T17:48:48+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आमची भूमिका कायम व्यापकच होती. एखादी गोष्ट १० वेळा बोलली तर लोकांना वाटते की, काहीतरी असावे बाबा. त्यामुळे आरोप करत असावेत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार यांनी खोचक शब्दांत पलटवार केला आहे.
राज ठाकरे हे सातत्याने शरद पवारांनी जातीयवाद पसरवला, पक्ष फोडले असा आरोप करत आहेत. शरद पवारांच्या जातीयवादाचे अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक सांगतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली. मात्र, त्यांनी ती काढली आणि ज्योतिबा फुले यांची पगडी घातली. खरे तर ती पगडी घालण्याला माझा विरोध नाही. पुणेरी पगडी न वापरता फुलेंची पगडी घालत जा,असे म्हणणे याला माझा विरोध आहे. हा एकप्रकारे जातीयवाद आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. याला आता शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.
कुणी मूर्खासारखे काही बोलले तर त्याची नोंद का घ्यायची?
कुणीतरी मूर्खासारखं काहीही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? माझ्या नेतृत्वात जो पक्ष चालत होता, कधी काळी शासनही चालत होते. त्यावेळचे निर्णय बघा. आम्ही कुणाला प्रोत्साहन दिले. आमच्या पक्षामध्ये विधिमंडळात नेतृत्व करायची निवड करायची आली होती तेव्हा आम्ही कुणाला निवडले ते बघा. मधुकर पिचड यांना नेता बनवले. छगन भुजबळ यांना नेता बनवले. २५ लोकांची यादी देऊ शकतो की, जे विविध जाती-जमातीचे होते. आदिवासी, दलित, ओबीसी सगळ्यांची नेमणूक आम्ही केली होती. आमची भूमिका कायम व्यापकच होती. राज ठाकरे नावाचे गृहस्थ जे काही बोलत आहेत त्याला आधार काय आहे मला माहिती नाही. काहीही ठोकून द्यायचे. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना वाटते की काहीतरी असावे बाबा. त्यामुळेच आरोप करत असावेत, असा पलटवार शरद पवार यांनी केला.
दरम्यान, पुणेरी पगडीबाबत जे काही राज ठाकरे बोलले तो कार्यक्रम महात्मा फुलेंचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात महात्मा फुलेंची पगडी मला घालण्यात आली. तर मी जातीयवादी कसा? महात्मा फुलेंनी कधीही जातीयवाद केला नाही. महात्मा फुले, त्यांचा विचार आम्ही अंगीकारतो. लगेच आम्हाला जातीयवादी कसे काय म्हणायचे? याला काही फारसा अर्थ नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले. ते सामला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.