“फडणवीसांनी मोठे काम काय केले? पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 06:00 PM2024-11-13T18:00:11+5:302024-11-13T18:04:00+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? अशी विचारणा शरद पवार यांनी केली आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचारसभा, बैठका यांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहेत. शरद पवार राज्यभर दौरा करून विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारसभांमध्ये भाजपा महायुतीवर टीका करताना महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचे आवाहन करत आहेत.
एका प्रचारसभेत बोलताना, देशात सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. ४०० पारचा नारा उद्ध्वस्त करायचे ठरवले. संविधान बदलाचा डाव उद्ध्वस्थ करण्यासाठी एकत्र आले पाहिजे होते. ज्या महाराष्ट्रात काँग्रेसचा एक खासदार, राष्ट्रवादीचे ४ खासदार होते. तुम्ही आम्हाला ४८ पैकी ३१ खासदार दिले, त्यात राष्ट्रवादीचे ८ खासदार होते. लोकसभेच्या निकालानंतर यांची चिंता वाढली. नवीन योजना आणल्या. विधानसभा निवडणुकीच्या त्यातील काही योजना राबवल्या. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात अनेक बहिणींचा पत्ता लागत नाही. महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ११०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाया गेले, शेतकऱ्याला कर्ज फेडता आले नाही. पीकाला भाव मिळाला नाही. भाजपाला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.
पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३० ते ४० आमदार गोळा केले. गुवाहाटीला जाऊन बसले. ही एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होती. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होती. असे असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली. लोकांना हे पटले नाही. देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात मोठे काम काय केले? असे विचारल्यानंतर पक्ष फोडला म्हणून सांगतात. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? आता भाजप आणि आमच्यातील फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेक जण मंत्री होते, असे शरद पवार यांनी सांगितले.