मोदींची शिवाजीपार्कवर सभा होणार; अमित ठाकरेंचा की सरवणकरांचा प्रचार करणार? नार्वेकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 05:35 PM2024-11-03T17:35:01+5:302024-11-03T17:35:55+5:30
मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पाडणाऱ्या माहिम मतदारसंघातच मोदींची सभा होत आहे. यामुळे मोदी माहिममध्ये सदा सरवणकरांसाठी प्रचार करणार की राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेंसाठी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. यापैकी एक सभा ही मुंबईत होणार आहे. मोदी शिवाजीपार्कवर महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. अशातच मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पाडणाऱ्या माहिम मतदारसंघातच मोदींची सभा होत आहे. यामुळे मोदी माहिममध्ये सदा सरवणकरांसाठी प्रचार करणार की राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेंसाठी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी मोदी हे महायुतीचा प्रचार करणार आहेत. माहिम मतदारसंघातील शिवाजी पार्कवर सभा होणार असली तरी ती मुंबईसाठी होणारी सभा आहे. यापूर्वीच्या सभा देखील या मुंबईसाठीच होत आल्या आहेत, असे नार्वेकर म्हणाले.
भाजपानेअमित ठाकरेंचा प्रचार करणार अशी भूमिका घेतल्याच्या प्रश्नावर नार्वेकरांनी सावध उत्तर दिले. महायुतीत जे आहेत त्यांची भाजपा प्रचार करेल. महायुतीच्या सभेला राज ठाकरे देखील येऊ शकतात, ते त्यांच्यावर आहे. कारण ही सभा मुंबईकरांची आहे. यामुळे ते देखील मुंबईकर आहेत. मोदी सभेतून महायुतीत असलेल्यांचाच प्रचार करणार आहेत, असे नार्वेकर म्हणाले.
माहिम मतदारसंघावरून महायुतीत मतभेद समोर आले आहेत. याठिकाणी एकनाथ शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. तर मनसेने या मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. उद्धव ठाकरे यांनीही महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहिममधील लढत तिरंगी होणार आहे. अशावेळी भाजपानेअमित ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. सरवणकर माघार घेतील असे वाटते, मात्र भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करू, असे भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.