Vidhan Sabha Election 2024: फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन देणार नाही - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:50 PM2024-11-16T12:50:58+5:302024-11-16T12:53:23+5:30

संजयकाकांचे भाऊ, पुतण्या व्यासपीठावर...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Power will not go to Devendra Fadnavis says Sharad Pawar | Vidhan Sabha Election 2024: फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन देणार नाही - शरद पवार 

Vidhan Sabha Election 2024: फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन देणार नाही - शरद पवार 

तासगाव : विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेसाठी नाही, तर लोकांची कामे करण्यासाठी मते मागत आहोत. आजचे राज्यकर्ते मात्र पैशाचा गैरवापर करून माणसे विकत घेतात आणि सत्ता मिळवत आहेत. निवडणुकीनंतर फडणवीसांच्या हातात सत्ता जाऊन द्यायची नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा तासगाव येथे शुक्रवारी झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, सुमनताई पाटील, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, अविनाश पाटील, महेश खराडे, विश्वास पाटील, स्मिता पाटील, सुरेश पाटील, जयसिंगराव शेंडगे, युवराज पाटील, सतीश पवार, रवींद्र पाटील, शंकर पाटील, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांना रोहित पाटील निवडून यावेत असे वाटत आहे. रोहितला पुढची पन्नास वर्षे राजकीय भविष्य आहे. त्याला तरुण पिढी एकटे पडू देणार नाही. या निवडणुकीत रोहित पाटीलला इतक्या विक्रमी मताधिक्याने निवडून द्या, की संपूर्ण राज्यभर विजयाची चर्चा झाली पाहिजे. रोहितसोबत खानापूर -आटपाडीमधून वैभव पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन पवार यांनी केले.

ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार सत्ता मिळविण्यासाठी २७४ खासदारांची गरज आहे. परंतु, मोदी व शाह यांनी मात्र लोकसभेला ४०० पारचा नारा दिला. हे बहुमत घटना बदलण्यासाठी आवश्यक आहे. यावरूनच त्यांच्या मनात काहीतरी वेगळा विषय असावा ही बाब ओळखून देशातील सर्व भाजप विरोधकांनी एकत्र येऊन आम्ही त्यांना रोखले. देशाची सत्ता भाजपची आहे. परंतु, घटना बदलण्याचे बहुमत व ताकद त्यांच्याकडे आता राहिली नाही, असे पवार यांनी सांगितले.

महिलांची सुरक्षा महत्त्वाची..

महिलांना महिन्याला १५०० रुपये द्यायला आमची काहीच हरकत नाही, पण तिची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची आहे. दोन वर्षांत ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झालेले आहेत. दर पाच तासाला एका महिलेवर अत्याचार होत आहेत. तसेच हजारो महिला गायब झालेल्या आहेत, ही चिंतेची बाब आहे, असे पवार म्हणाले.

विरोधकांची गुंडगिरी मोडून काढणार : रोहित पाटील

तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आपला विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. गेल्या १० वर्षांच्या खडतर प्रवासात निष्ठावंत शिलेदार आणि सर्वसामान्य जनतेनेच मला आणि आमच्या कुटुंबाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. मतदारसंघात ८५० कोटी रुपयांचा निधी आणला. टेंभू, आरफळ, म्हैसाळ योजनेतून शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण येत्या २४ तारखेपासून विरोधकांची गुंडगिरी मी मोडून काढणार. संजयकाकांनी त्यांच्या सत्तेच्या काळातील कर्तृत्व सांगण्यासाठी एका स्टेजवर माझ्या समोर यावे. फार तर स्टेजची व्यवस्था मी करतो. मला एकटं पाडण्यासाठी सगळे विरोधक ज्या ज्यावेळी एकवटतात, तेव्हा छातीचा कोट करून जनता आमच्यासोबत उभी राहते, असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

संजयकाकांनी ग्रामपंचायत लढवावी : विशाल पाटील

राज्यात वसंतदादा व शरद पवारांना मानणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमीच आर. आर. आबा उभे राहिले. सत्तेशिवाय संजय पाटील यांना जमतं नाही, म्हणून त्यांनी पक्ष बदलून उमेदवारी घेतली. सत्तेसाठी स्वत:च्या मुलाला थांबवून उभे राहिले. संजयकाका यांनी आता ग्रामपंचायत निवडणूक लढवावी लागेल, अशी टीका विशाल पाटील यांनी केली.

संजय पाटील यांच्यावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला : शरद पवार

संजय पाटील यांना विधानपरिषदेवर आमदार करावे, असा आग्रह आर. आर. पाटील यांनी धरला होता. मी त्याचवेळी आर. आर. पाटील यांना सांगितले होते की, त्यांना आमदार करू नका. कारण हा माणूस विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही आणि शेवटी तेच खरं झालं. ज्या दिवशी विधानपरिषदेचा कार्यकाल संपला त्याच दिवशी त्यांनी पक्ष सोडला. भाजपमधून खासदार झाले आणि आता भाजप सोडली.

संजयकाकांचे भाऊ, पुतण्या व्यासपीठावर..

रोहित पाटील यांच्या विरोधातील उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कुटुंबातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दिनकरआबा पाटील पूत्र अविनाश पाटील आणि माजी संरपंच अक्षय पाटील विधानसभा निवडणुकीत राजकीय व्यासपीठावर कोठेही दिसले नव्हते. मात्र, शरद पवार यांच्या आजच्या कार्यक्रमात संजयकाका यांचे हे चुलतभाऊ व पुतणे यांनी हजेरी लावल्याने त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Power will not go to Devendra Fadnavis says Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.