राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 11:08 AM2024-10-26T11:08:02+5:302024-10-26T11:08:35+5:30
राज ठाकरेंचे महत्वाचे शिलेदार असलेले, मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेले पालघरचे नेते उमेश गोवारी यांनी रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांच्या या पक्षातून त्या पक्षात उड्या पडू लागल्या आहेत. काही जण उमेदवारी मिळविण्यासाठी तर काहीजण उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून पक्ष बदलत आहेत. असाच एक मोठा फटका मनसेला बसला आहे.
राज ठाकरेंचे महत्वाचे शिलेदार असलेले, मनसेच्या स्थापनेपासून सोबत असलेले पालघरचे नेते उमेश गोवारी यांनी रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघरमध्ये दोन्ही मतदारसंघांत राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादले आहेत. यामुळे गोवारी हे नाराज होते. त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उमेश गोवारी यांनी २०१९ ची निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यंदाही ते उत्सुक होते. परंतू, राज ठाकरेंनी दोन्ही मतदारसंघात दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले. रात्री उशिरा गोवारी यांच्यासोबत डहाणू, तलासरीमधील आठ पदाधिकारी आणि डझनभर ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
मनसेने पालघर विधानसभा मतदारसंघातून नरेश कोरडा आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सचिन शिंगडा यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे गोवारी नाराज झाले होते.
भाजपचे संतोष शेट्टी शिंदे गटात...
भिवंडी पूर्व विधानसभा शिवसेना शिंदे गट लढवणार यावर शिक्कामोर्तब करणारी घटना घडली आहे. भाजपा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला आहे.