“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 02:11 PM2024-11-05T14:11:32+5:302024-11-05T14:14:07+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राजरत्न आंबेडकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे काही प्रश्न निर्माण झाले असून, निवडणुकीतून माघार घेण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्यावर दबाव होता का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: आम्ही अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा दिलेला नाही. राखीव असो किंवा इतर जागा असोत तेथे आमचा पाठिंबा अद्याप तरी जाहीर केलेला नाही. मित्रपक्षाची यादी आलेली नाही. एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे निवडणुकीत उमेदवार द्यायचा नाही. आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केले. यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. परंतु, राजरत्न आंबेडकर यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना सुरुवात झाली असल्याचे सांगितले जात आहे.
मीडियाशी बोलताना राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले की, निवडणूक लढवायची की नाही, हा निर्णय मनोज जरांगे यांचा आहे. आम्ही त्यांच्या या निर्णयाचा आदर करतो. मराठा समाजाच्या मनात कोणताही भ्रम राहू नये किंवा त्यांच्या मनात कोणता द्वेष निर्माण होऊ नये, म्हणून हे स्पष्टीकरण देत आहे. उमेदवारांची यादी न मिळणे हे निवडणूक न लढवण्याचे कारण नाही, असे राजरत्न आंबेडकर यांनी म्हटले आहे.
उमेदवारांची यादी अगोदरच दिलेली होती
दलित, मराठा आणि मुस्लीम यांच्यातील युती हे समीकरण गावागावांत जाऊन पोहोचलेले आहे. याला धक्का लागू नये यासाठी हे स्पष्टीकरण देत आहे. मला मराठा समाजातून अनेक फोन कॉल्स येत आहेत. तुम्ही उमेदवारांची यादी का दिली नाही? अशी विचारणा केली जात आहे. दलित आणि मुस्लीम नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी माझ्याकडे दिलेली नाही. त्यामुळेच आम्ही निवडणूक लढवत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मात्र हे कारण नाही. एकमेकांना एकमेकांचे उमेदवार अगोदरपासूनच माहिती होते. उमेदवारांच्या यादीची देवाणघेवाण अगोदरच झालेली होती. कोणकोणत्या जागांवर उमेदवार बदलायला हवे होते, यावरही चर्चा झाली होती. मुस्लीम, बौद्ध, दलित समाजाच्या उमेदवारांची यादी अगोदरच दिलेली होती, असे राजरत्न आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी निवडणूक न लढवण्याचे जे कारण दिले, त्यामुळे मराठा, दलित, बौद्ध, मुस्लीस समाजात एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक लढवणे हा आमचा उद्देश नाही. आमच्यासाठी समाजातील एकता महत्त्वाची आहे. मनोज जरांगे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? याबाबत मला माहिती नाही, असेही राजरत्न आंबेडकर यांनी नमूद केले.