“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 07:15 PM2024-12-02T19:15:15+5:302024-12-02T19:18:16+5:30

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: राज्यात दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत, पराभूत झालो असलो तरी माझा वेग आता वाढेल, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bacchu kadu criticized bjp mahayuti and devendra fadnavis | “गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका

“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा झाला तरीही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण होणार, सत्ता कधी स्थापन करणार, याबाबत स्पष्टता दिसत नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. तसेच ईव्हीएमविरोधातील लढाई तीव्र केली आहे. यातच आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता, असा दावा करत बच्चू कडू यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालात निर्विवाद बहुमत मिळवल्यानंतर आठवडा उलटला तरी महायुतीला मुख्यमंत्र्यांची निवड करून नवे सरकार स्थापन करता आलेले नाही. या निवडणुकीत १३२ जागा जिंकत बहुमताजवळ मजल मारल्याने भाजपाने मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे मागची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांची निराशा झाली आहे. मुख्यमंत्रीपद नसेल तर सरकारमध्ये सन्मानजनक वाटा मिळावा, गृहमंत्रीपद शिंदे गटाकडे द्यावे, अशा मागण्या करत एकनाथ शिंदे यांनी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या मार्गात तिढा निर्माण झाल्याचे चित्र आहे. यातच बच्चू कडू यांनी ईव्हीएमबाबतही शंका उपस्थित करत भाजपावर निशाणा साधला.

मैत्रीसाठी एकदाही नाही, सत्तेकरिता देवेंद्र फडणवीसांनी फोन केला

देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेसाठी फोन केला होता. मात्र माझ्या मतदारसंघासाठी काही मदत हवी आहे का? काही निधी हवा आहे का? यासाठी कधीही त्यांनी फोन केला नाही. मैत्री टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही मला फोन केला नाही. गरज सरो आणि वैद्य मरो! हा भाजपाचा धर्म आहे, या शब्दांत प्रहार करत, राज्यात दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत. त्यात दिव्यांग, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत राहण्याचा विश्वास आहे. जाती-धर्माकडे एकंदरीत निवडणूक नेण्याचा परिणाम झाला. त्यामुळे माझा पराभव हा तांत्रिक पराभव आहे. ईव्हीएम मशीनचा त्यात सहभाग आहे. माझी गफलत झाली. पराभूत झालो असलो तरी माझा वेग आता  वाढेल. पराभूत झाल्यावर आनंद आहे कारण दिव्यांगांसाठी काम करत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांना बऱ्याचदा सांगत होतो की, तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल. रात्री दोन वाजता सर्वसामान्यांना भेटणारा मुख्यमंत्री मी एकनाथ शिंदे यांच्या रूपात पाहात होतो. त्यामुळे शिंदे यांना आपण दाबून ठेवले पाहिजे असे भाजपाला वाटत होते. एकनाथ शिंदे यांचे काम बोलत होते, त्यामुळे सत्तेत असताना ते त्यांना दाबू शकले नाहीत. भाजपाला एकहाती सत्ता घ्यायचीच आहे, त्यामुळे आता  एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता, असा दावा बच्चू कडू यांनी केला. 
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 result bacchu kadu criticized bjp mahayuti and devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.