विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:53 IST2024-11-27T15:48:50+5:302024-11-27T15:53:28+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले दिसत आहे. नवे सरकार कधी स्थापन होणार, मंत्रिमंडळ कसे असणार, कोणाकडे कोणती खाती जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच महायुतीला मिळालेल्या एवढ्या मोठ्या यशानंतर आता विरोधकांनी ईव्हीएमवर संशय घेतला आहे. तसेच अनेक ठिकाणी तफावत असल्याचे दावेही केले आहेत. याबाबत भाजपाकडून आता थेट प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करून, हॅक करून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकल्याचा आरोप विरोधक सातत्याने करताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी तशी तयारी करण्याच्या सूचना दिल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटाकडूनही याबाबत विचार केला जात आहे. ईव्हीएमविरोधात मोठे आंदोलन उभारण्याच्या हालचाली विरोधकांकडून सुरू आहेत. या सगळ्यावर भाजपाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करताना विरोधकांना सुनावले आहे.
लोकसभेतही तुम्ही मोठे यश मिळवले तेव्हा ईव्हीएम चांगले होते का?
नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकली, तिथे ईव्हीएम चांगले होते का? लोकसभेतही तुम्ही मोठे यश मिळवले तेव्हा ईव्हीएम चांगले होते का? जर ईव्हीएम हॅक करून मते घेता आली असती तर आम्ही नांदेड लोकसभेतही तशी मते घेतली नसती का? हा विरोधकांचा खोटारडेपणा आहे. ते हरले आहेत. परंतु, पराभव स्वीकारत नाहीत. त्यांनी त्यांचा पराभव स्वीकारावा आणि आत्मचिंतन करावे, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केले. त्या पराभवातून आम्ही शिकलो. लोकसभा निवडणुकीत आम्हाला जे अपयश आले, त्यानंतर आम्ही काही नव्या गोष्टी शिकलो. त्या पराभवानंतर आम्ही आत्मचिंतन केले. पुढे काय करायचे ते ठरले. रणनीती ठरवली. आम्ही प्रत्येक बूथवर जाऊन काम केले. मतदान केंद्रांवर जाऊन जनतेला भेटलो. त्यानंतर मतदानाचे प्रमाण वाढले. विरोधकांना चार दिवस त्यांना झोप लागणार नाही. जेव्हा त्यांची झोप होईल, त्यानंतर त्यांचे डोक शांत राहील, असा खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला.