“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:43 PM2024-11-28T19:43:26+5:302024-11-28T19:47:09+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत सर्वांत आघाडीवर असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटून गेले असले तरी अद्याप महायुतीने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्याने आता भाजपाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, भाजपाकडून अद्याप याबाबत कोणत्याही निर्णय झालेला नाही. भाजपा धक्कातंत्राचा वापर करणार की, देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातच दिल्लीत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींसोबत एकनाथ शिंदे, अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित असणार आहेत. तत्पूर्वी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे म्हटले जात आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपदाबाबत दिल्लीतील भाजपाच्या नेतृत्वाने निर्णय घ्यावा. त्याला आमचा पाठिंबा असेल, असे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणार, याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर भाजपाच्या गोटातून हालचालींना वेग आला. मुख्यमंत्री कोण होणार, यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य काही नावे मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत दावे-प्रतिदावे केले जात असतानाच चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते
भारतीय जनता पक्ष नेहमीच नवीन नेतृत्व शोधत असते. संघटनेत काम करताना पक्षश्रेष्ठी लक्ष ठेवत असतात. निवडणूक झाल्यावर निकाल विश्लेषण करण्यात आले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश यांप्रमाणे नवीन प्रयोग राज्यातही राबवणार का याबाबत मला कल्पना नाही. पक्षाची केंद्रीय समिती असून त्यात विविध विषय चर्चा होऊन त्यात वेगवेगळ्या जवाबदारी वाटप करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आमचे नेते कोणाला मंत्री पद द्यायचे याबाबत निर्णय घेतील. महिला आमदार आणि मंत्री भाजपाचे अधिक आहेत. सर्वोच्च न्यायलयाने ईव्हीएमबाबत स्पष्ट मत मांडले असून सर्व आरोप मोडीत काढले आहेत, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.