निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 07:18 PM2024-11-25T19:18:23+5:302024-11-25T19:18:27+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, पक्षनिष्ठ यांचे फोन आले. पक्षासाठी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेत आहे, असे या नेत्याने म्हटले आहे.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलाच धक्का बसला. अविश्वसनीय, अनाकलनीय आणि अस्वीकार्ह निकाल असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांकडून देण्यात आली. महायुतीच्या त्सुनामीत महाविकास आघाडीचा मोठा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीला आता विरोधी पक्षनेता बसवणेही शक्य होणार नाही. या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवत १३२ जागा जिंकल्या. यानंतर आता उमेदवारीवरून तीव्र नाराजी व्यक्त करत थेट राजकीय संन्यास घेतलेल्या एका नेत्याने आता युटर्न घेत आपला निर्णय बदलला आहे.
कारण नसताना वेगवेगळे चुकीचे आरोप करण्यात आले. पक्षाने तिकीट दिले होते. परंतु मागे घेण्यास सांगितले. पक्षाचा आदेश मान्य करत मागे घेतले. त्यानंतर नाराज नव्हतो. भाजपा उमेदवारासाठी २७ सभा घेतल्या. अनेक मेळावे घेतले. परंतु, मतदारसंघात मी काम केले नाही, असे चुकीचे आरोप केले जात आहे. कामे केली नसती तर निवडून येऊ शकलो नसतो, काम केले नसती तर मेळावे कशाला घेतले असते. आताही गावागावांत माझा कार्यकर्ता आहे. माझ्यावर होत असलेले आरोप पाहून वाटते, अर्ज मागे नसता घेतला, उभाच राहलो असतो तर बरे झाले असते, अशी नाराजी बोलून दाखवत दादाराव केचे यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते.
असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, पक्षनिष्ठ यांचे फोन आले
कार्यकर्त्यांनी सभा बोलावली म्हणून येथे हजर झालो. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेत आहे. पक्षाचे उमेदवार सुमित वानखेडे यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला. बदनामी केली. त्याने मी उद्विग्न झालो. त्याच निराशेत मी पत्रकार परिषदेत संन्यास घेत असल्याची घोषणा केली. पण पुढील दिवसात मला असंख्य कार्यकर्ते, हितचिंतक, पक्षनिष्ठ यांचे फोन आले. तुम्ही संन्यास घेणार तर आमचे कसे होणार, असा सवाल हे कार्यकर्ते विचारू लागले. मी विचारात पडलो, असे दादाराव केचे यांनी सांगितले.
दरम्यान, या ठिकाणी सांगतो की, पक्षाच्या नेत्यांचे, सुमित वानखेडे यांचे मन कलुषित करणारे काही जण आहेत. अमित शाह, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द दिला आहे तो ते पाळतीलच. या भागात मी पक्ष उभा केला आहे. सहा महिन्यांत पक्ष उभा होत नाही. त्याच पक्षासाठी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय मागे घेत आहे, अशी घोषणा केचे यांनी केली.