“मोदी-शाह, १० हजार लाडक्या बहिणी, २ हजार शेतकरी शपथविधीला येणार”; भाजपा नेत्याने यादीच वाचली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 06:01 PM2024-12-03T18:01:35+5:302024-12-03T18:01:45+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: उद्धव ठाकरे यांना महायुतीच्या शपथविधीचे निमंत्रण देणार का, या प्रश्नावर भाजपा नेत्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकीकडे एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे महायुतीच्या बैठका थांबल्या आहेत. मुख्यमंत्री कोण होणार? किती आमदार मंत्री म्हणून शपथबद्ध होणार? खाते वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आणि कोणत्या पक्षांकडे कोणती खाती जाणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महायुतीची बैठक होणार नसल्याने अनुत्तरित राहत आहेत. तर दुसरीकडे, भाजपासह महायुतीचे नेते आझाद मैदानावर जाऊन ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीच्या भव्य सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठकांचे सत्र सुरूच आहे. अशातच भव्य शपथविधी सोहळ्याला नेमके कोण-कोण उपस्थित राहणार, याबाबत भाजपा नेत्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महायुतीकडून शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. समन्वयक आमच्यासोबत जोडले गेले आहेत. भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपब्लिकन पार्टीसह १८ घटक पक्ष महायुतीत आहेत. आढावा बैठकीत प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या आहेत. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान यांच्यासह ९ ते १० केंद्रीय मंत्री शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. तसेच भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही येणार आहेत, असे प्रसाद लाड यांनी सांगितले.
१० हजार लाडक्या बहिणी, ५ हजार शेतकरी शपथविधीला येणार
पुढे बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, १९ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधीला येणार आहेत. याबरोबरच सर्वधर्मीय गुरुवर्य, साधु-संत-महंत आशीर्वाद देण्यासाठी शपथविधीला येणार आहेत. याशिवाय ५ ते १० हजार लाडक्या बहिणी, २ ते अडीच हजार शेतकरी येणार असून, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील हाऊसिंग सोसायट्यांनी आम्हाला भरीव मदत केली. अशा ५ हजार सोसायट्यांचे चेअरमन, सेक्रेटरी हेही येणार आहेत. वारकरी पंथाचे लोक येणार आहेत. डबेवाले येणार आहेत. ४० ते ५० हजार कार्यकर्ते त्या सभास्थळी दिसतील. याशिवाय २ हजार व्हीआयपी, व्हीव्हीआयपी यांची व्यवस्था केली आहे. हा अभूतपूर्व सोहळा होणार आहे. महाराष्ट्रात जिथे एलईडी स्क्रीन आहेत, तिथे सगळ्या ठिकाणी हा शपथविधी सोहळा लाइव्ह दाखवला जाणार आहे, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याला बोलावणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना बोलावले जाईल. परंतु, आता येणं किंवा न येणं किंवा कोतेपणा दाखवणे, हा त्यांचा प्रश्न आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.