“उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 03:35 PM2024-12-01T15:35:45+5:302024-12-01T15:38:44+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊत आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडणे लावत आहेत. सहा महिने थांबा, संजय राऊतांच्या बोलण्याने काय काय झालेय, ते कळेल, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली.
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएमवर टीका करत असून, अनेक उमेदवार फेरमतमोजणीची मागणी करत आहेत. भाजपा नेत्यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
रावसाहेब दानवे यांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, पाच तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे, आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. जसे ठरले तसे सुरू आहे, कोणताही वाद आमच्यामध्ये नाही. मुख्यमंत्रीपद कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, मात्र मुख्यमंत्री कोण हे आमचे ठरले आहे. जोपर्यंत वरिष्ठांची सही होत नाही, तोवर अधिकृतरित्या नाव जाहीर केले जात नाही, असा आमच्या पार्टीचा विषय आहे. भाजपा राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहे. वरिष्ठांचा शिक्का बसत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदी कोण? याबाबत कुठलीही घोषणा होणार नाही. कोणतीही अडचण नाही. सगळे ठरल्याप्रमाणेच होणार आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते
संजय राऊत काय म्हणतात किंवा आतापर्यंत काय बोललेत, याचा इतिहास जर काढला, तर नक्कीच एखादा डॉक्टर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देईल. ते जे बोलले, ते खोटे ठरले आहे. संजय राऊतांनी शिवसेना फोडली. संजय राऊत आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्ये भांडणे लावत आहेत. सहा महिने थांबा, संजय राऊतांच्या बोलण्याने काय काय झालेय, ते कळेल. शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेला नसता, तर २०१४ ते २०१९ या काळात जसे सरकार चालवले गेले तसेच ते आताही सुरू असते. २०१९ ला तर बहुमत आलेच असते. परंतु, आता ते सोबत असते, तर आताही जास्त बहुमत मिळाले असते, असा दावा दानवे यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे वृत्त दानवे यांनी फेटाळून लावले आहे. एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत, केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली ही बातमी आहे. ते स्वतःच्या गावी गेले आहेत, यात शंका उपस्थित करण्याचा प्रश्न नाही. ते आजारी आहेत. त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असेल, गावी जाण्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे, असे दानवे म्हणाले.